येवला तालुक्यातील २६ रस्त्यांना जिल्हा मार्ग दर्जा

नाशिक :- येवला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील एकूण २६ ग्रामीण मार्ग रस्त्यांना इतर जिल्हा मार्ग तर एका इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्यात आले आहे. सदर रस्त्यांची दर्जोन्नती झाल्यामुळे या रस्त्यांचे लवकरच बळकटीकरण होणार असल्याने ग्रामीण भागातील शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहचविण्याकरिता तसेच दळणवळणाच्या दृष्टीने या रस्त्यांचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे.

राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील पाटोदा सातारे एरंडगाव रवंदा (अ.नगर जिल्हा) हद्द या इतर जिल्हा मार्ग १९१, ग्रामीण मार्ग १६ व ४३ या एकूण १५.५०० किलोमीटर रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती मिळाली असून या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग १७८ हा क्रमांक प्राप्त झाला आहे. हा रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाला आहे.लवकरच या रस्त्याच्या सुधारणेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी उपलब्ध होणार असल्याने परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी या रस्त्याचा फायदा होणार आहे.

त्याचप्रमाणे येवला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील २६ ग्रामीण मार्ग रस्त्यांना इतर जिल्हा मार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे.

(छायाचित्र प्रतीकात्मक)