Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

केशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यासाठी सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वितरण

मुंबई दि. २९-मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे जून २०२१ करिता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ  देण्यात येणार असल्याची माहिती मुंबईचे  शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली.

राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत एपीएल  (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे- २०२० ते ऑगस्ट २०२० या चार महिन्याच्या कालावधीकरीता सवलतीच्या दराने  गहू रुपये ८/- प्रति किलो व तांदूळ रुपये १२ प्रति किलो प्रतिमाह प्रतिव्यक्ती  ३ किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्याचा सवलतीच्या दराने लाभ देण्यात आला आहे.

या  योजनेतील अधिकृत शिधावाटप दुकानामध्ये शिल्लक असलेल्या अन्नधान्याचे वाटप एपीएल  (केशरी) शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह प्रतिव्यक्ती १ किलो गहू व १ किलो तांदूळ याप्रमाणे २ किलो अन्नधान्य माहे जून २०२१ करिता गहू रुपये ८ प्रतिकिलो व तांदूळ रुपये १२ प्रतिकिलो या सवलतीच्या दराने वितरण करण्यात येईल.

एपीएल  (केशरी) शिधापत्रिकाधारकांपैकी जे शिधापत्रिकाधारक अन्नधान्याची प्रथम मागणी करतील (FIRST COME FIRST SERVE) त्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य वितरण करण्यात येईल.

सदर योजनेतील ज्या अधिकृत शिधावाटप दुकानामध्ये सदर योजनेतील अन्नधान्य शिल्लक आहे त्याच शिधावाटप दुकानातून अन्नधान्य वितरण करण्यात येईल.

एपीएल  (केशरी) शिधापत्रिकाधारकांनी अधिकृत शिधावाटप दुकानात गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्कचा वापर करुन सवलतीच्या दराने मिळणारे उपलब्ध अन्नधान्य प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version