आता देशातील १०० गावात होणार डिजिटल शेती

केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून 6 राज्यांतील 100 गावात पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी मायक्रोसॉफ्टबरोबर सामंजस्य करार

6 राज्यांतील 100 गावात पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने मायक्रोसॉफ्टबरोबर काल सामंजस्य करार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिजिटल शेतीची कल्पना आता आकार घेत आहे असे यावेळी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण, ग्रामविकास, पंचायती राज व अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले. 2014 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदींनी शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जेणेकरुन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि त्यांचे उत्पन्न वाढू शकेल. तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली तर ती शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरेल आणि नवीन पिढीही शेतीकडे आकर्षित होईल.

मायक्रोसॉफ्टने कापणी व्यवस्थापन आणि वितरणासह स्मार्ट आणि सुसंघटित शेतीसाठी शेतकरी संवाद विकसित करण्यासाठी 6 राज्यांमधील (उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थान आणि आंध्र प्रदेश) 10 जिल्ह्यातील निवडक 100 गावात पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पासाठी मायक्रोसॉफ्टने आपला स्थानिक भागीदार क्रॉप डेटाला सहभागी करून घेतले आहे.