Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

धुळे जिल्ह्याची कोविड-१९ लढाईत सर्वोत्कृष्ट कामगिरी

कोविड मुक्तांचे प्रमाण जवळपास 85 टक्क्यांवर तर कोविड डब्लिंग रेटमध्ये सुद्धा अग्रस्थानी

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील कोविड-19 युद्धात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा जिल्हा म्हणून धुळे पहिल्या स्थानी असून कोविड मुक्तांचे प्रमाण जवळपास 85 टक्क्यांवर तर कोविड डब्लिंग रेटमध्ये सुद्धा धुळे जिल्हा अग्रस्थानी असल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सर्व संबंधित यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

आरोग्य विभागाच्या एकत्रित संकलित अहवालानसुार धुळे येथील कोविडमुक्तांचे (Recovery Rate) प्रमाण 84.22 टक्के इतके असून ते महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रमाण आहे. याशिवाय कोविड डब्लिंग रेटमध्ये सुद्धा धुळे जिल्हा महाराष्ट्रात प्रथम आहे. कोविडमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सुरुवातीला  100 टक्के होते मात्र आता यात सुधारणा होऊन हा मृत्यू दर 2.66% इतका खाली आला आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी धुळे आणि मालेगाव येथे कोविड -19 परिस्थितीशी निपटण्यासाठी खास नेमणूक केलेल्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे यांच्यासह प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र डॉ. निर्मलकुमार खंदळे, प्राध्यापक व विभागप्रमुख बधिरीकरणशास्त्र डॉ.राजेश सुभेदार, कोविड समन्वयक डॉ.दीपक शेजवळ, सर्व डॉक्टर्स, सर्व नर्सिग स्टाफ, सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांचेही अभिनंदन

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे अभिनंदन आणि आभार मानले आहेत. कोविड-19 परिस्थिती पाहता, पालकमंत्री श्री.सत्तार यांनी धुळे जिल्ह्यासाठी लिक्विड ऑक्सिजन युनिटला मान्यता दिली. तर धुळ्याचे जिल्हाधिकारी डॉ. संजय यादव यांच्या नेतृत्चाखाली सर्व टीम काम करीत आहे.

23 सप्टेंबर 2020च्या आरोग्य विभागाच्या अहवालानसुार धुळे येथील श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे प्रामुख्याने येथील आदिवासी, दुर्बल आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील नागरिक येत असतात. याच रुग्णालयात कोविड-19च्या रुग्णांवरही उपचार करण्यात येत आहेत. कोविड-19 मध्ये लोकसहभाग हा खूप महत्त्वाचा असून धुळेकर जनतेने राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याने कोविड-19 रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे.

Exit mobile version