Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

खरीपातील खत-बियाणे संदर्भात उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

खरीप हंगामात बियाणे, खते, किटकनाशके यांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

▪️ 2 लाख 19 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे नियोजन
▪️ आज अखेर 4 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध, आवश्यकतेप्रमाणे पुरवठा सुरु
▪️ 1 लाख 15 हजार मॅट्रीक टन खताची उपलब्धता
▪️ खरिपाचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे काम गतीने सुरु

पुणे, दि. 07 : खरीप हंगामामध्ये बी बियाणे, खते, किटकनाशके यांची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी, शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे, एकही पात्र शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज खरीप हंगामासाठी लागणारे बी बियाणे, खते, किटकनाशकांची उपलब्धता तसेच पीक कर्ज वाटपाबाबत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अशोक पवार, आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ शितलकुमार मुकणे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आनंद बेडेकर, महावितरणचे अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार, चंद्रशेखर पाटील, आदींसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे जिल्ह्यात 2 लाख 19 हजार 700 हेक्टर क्षेत्राचे खरीप हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे यामध्ये, भात, ज्वारी, बाजरी, भुईमुग, मका, सोयाबीन यांचा समावेश आहे. यासाठी शेतक-यांच्या मागणीप्रमाणे बियाणे, खते, कृषी निविष्टा यांची कमतरता भासणार नाही, तसेच कृषी विभागाने बियाणे उपलब्धतेबाबत व बियाणांच्या गुणवत्तेबाबत अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे. तसेच खतांच्या व बियाणांच्या संदर्भात कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
ऊस पाचट अभियानाची अंमलबजावणी, भात पिकांमध्ये युरिया ब्रिकेटचा वापर, हुमणी नियंत्रण, यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड, आदि नाविण्यपूर्ण उपक्रमांना गती द्यावी असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त क्षेत्रात फळबाग लागवड करावी, आंबा लागवडीसाठी मागणीप्रमाणे शेतक-यांना कलमे उपलब्ध करून द्यावीत, तसेच बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांच्या उत्पादन आराखड्याची अंमलबजावणी तत्परतेने करावी, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्हा खरीप हंगाम 2021 च्या नियोजनाबाबत माहिती दिली.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे म्हणाले, दोन लाख 19 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर खरिप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. या क्षेत्रासाठी 26 हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. त्यापैकी आजपर्यंत 4 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. आवश्यकतेप्रमाणे पुरवठा सुरूच आहे. शेतक-यांनी सोयाबीन बियाण्याबाबत घरच्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून वापर करावा. खतांमध्ये एक लाख 85 हजार मेट्रिक टनाची मंजूर असून मागील हंगामातील 90 हजार मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. चालू वर्षी 25 हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा झाला असून एकूण एक लाख 15 हजार मेट्रिक टन खतांची उपलब्ध्ता आहे. तथापी शेतक-यांनी माती परिक्षणानुसार दिलेल्या शिफारसीप्रमाणे खताचा वापर करावा. खरिपाचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे.

खत व मागणी पुरवठा, कृषी निविष्टा विक्रेत्यांची संख्या खरीप हंगाम क्षेत्र, कृषी निविष्टा व गुण नियंत्रण, पिक कर्ज वाटप, सिंचन नियोजन, शेती पंपाना विज पुरवठा, टंचाई नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, कृषी विस्तार कार्यक्रम, क्रॉपसॅप प्रकल्प, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, आदींसह कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version