‘इंडियन ऑटो शो’ चे उद्घाटन
मुंबई, दि. 12 : पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यासाठी राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वतंत्र धोरण आणले आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊन भविष्यात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने या क्षेत्राला मोठा वाव असेल, असे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले आहे.
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये ‘इंडियन ऑटो शो’ ला प्रारंभ झाला. त्याचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या शोमध्ये प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या सहभागी झाल्या आहेत.
उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले की, ऑटोमाबाईल क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. नव्या तंत्रज्ञानावर आधारित वाहने बाजारात दाखल होत आहेत. चारचाकी वाहने वापरणे आज प्रत्येकाची गरज झाली आहे. ग्राहकांना आपल्या आवडी निवडीनुसार वाहने निवडण्याची संधी या प्रदर्शनामुळे उपलब्ध झाली आहे. या प्रदर्शनामुळे व्यापाराला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही श्री.देसाई यांनी व्यक्त केला.
यावेळी एमआयडीसीचे मार्केटींग हेड अभिजित घोरपडे, प्रसन्न पटवर्धन, दीपक नायर आदी मान्यवर उपस्थित होते.