Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

औरंगाबाद जिल्ह्यातील त्या शेतकऱ्यांच्या कर्ज मुक्तीचे निर्देश

मुंबई, दि. 30 : औरंगाबादमधील आडगाव बुद्रुक, निपाणी व सातारा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पात्र ठरलेल्या 225 लाभार्थींना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत कर्जमुक्ती देण्यात यावी, असे निर्देश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.

मंत्रालयात औरंगाबाद तालुक्यातील आडगाव बु., सातारा व निपाणी  विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सभासदांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणेबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री.पाटील बोलत होते. या बैठकीस आमदार कैलास पाटील, सहकार आयुक्त अनिल कवडे, सहकार सह निबंधक श्री.वाडेकर आदींसह संस्थांचे सचिव, बँकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले, आडगाव बु. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, सातारा विकासेसो, निपाणी विकासेसो या तीन संस्थांच्या सदस्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या २२५ सभासदांना कर्ज माफी करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी.

यामध्ये 623 शेतकऱ्यांना व्याज माफ करण्यासंदर्भात आणि उर्वरित मुद्दल किती यासंदर्भात मोंढा येथील सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांनी तपशीलवार माहिती सादर करावी. तसेच,  शेतकऱ्यांना दिलासा देण्यासंर्भात काही सकारात्मक निर्णय घेता येईल का यासाठी प्रधान सचिव, सहकार आयुक्त, संस्थेचे सचिव आणि बँकेचे अधिकारी यांच्यासमवेत तातडीने बैठक घेऊन बँकेने या संदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशा सूचना श्री पाटील यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Exit mobile version