नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी महाराष्ट्रालाच

कळमुस्ते प्रवाही वळण योजना, वैतरणा मुकणे वळण योजना आणि उर्ध्व कडवा प्रकल्पांची आढावा बैठक संपन्न

नाशिक :

गेल्या काही काळात गोदावरी खोऱ्याचे पाणी गुजरातच्या प्रकल्पांना देण्याचे प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु महाराष्ट्रातील अनेक भाग पाण्यापासून वंचित असल्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्याची तहान भागविणे आवश्यक आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचे पाणी महाराष्ट्राच्या बाहेर न जावू देता त्याचा फायदा महाराष्ट्राच्याच जमिनीला देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, प्रवाही वळण योजना कळमुस्ते ही योजना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते शिवारातील डोंगरगाव या गावाजवळील दमणगंगा खोऱ्यातील वाल नदीच्या स्थानिक नाल्यावर प्रस्तावित आहे. गोदावरी व तापी खोऱ्यातील उपलब्ध पाण्याचा पुर्णपणे वापर झाला असल्यामुळे शासनाने औरंगा, अंबिका, नारपार, दमणगंगा, उल्हास व वैतरणा खोऱ्यातील नद्यांचे पाणी अरबी समुद्रात वाहून जात होते त्यामुळे गोदावरी व तापी खोऱ्यात वळविण्याचा अभ्यास समन्वय समितीमार्फत करण्यात आला.

त्यानुसार 19 प्रवाही वळण योजनेद्वारे 2321 द.ल.घ.फु. पाणी नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यात उपलब्ध होणार आहे. यामध्ये कळमुस्ते ही मोठी वळण योजना असून याद्वारे दमणगंगा खोऱ्यातील  19.54 द.ल.घ.मी.पाणी गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्याचे नियोजन असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले. तसेच त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडीजवळ बांधण्यात येणाऱ्या कळमुस्ते धरणाचे संकल्पचित्र महिन्याभरात पूर्ण करुन शासनाला सादर करण्याची सूचना मध्यवर्ती संकल्प चित्र संघटनेच्या अधिकाऱ्यांना यावेळी श्री. भुजबळ यांनी केली.

वैतरणा धरणाचे 1 टीएमसी पाणी मुळणे धरणात वळविणार

वैतरणा धरण पुर्णपणे भरल्यानंतर सांडव्यावरुन वाहून जाणारे पुराचे पाणी वैतरणा नदीन पडून अरबी समुद्राला जाऊन मिळत असल्याने उर्ध्व वैतरणा-मुकणे धरण प्रवाही वळण योजनेतंर्गत उर्ध्व वैतरणा धरणाच्या सॅडल डॅमद्वारे 1 टीएमसी पाणी मुळणे धरणात वळविण्यात येण्याबाबत या बैठकित चर्चा करण्यात आली.  तसेच वैतरणा धरणासाठी अतिरिक्त संपादित झालेल्या जमिनीबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अमंलबजावणी करण्यात येणार असल्याचे, पालकमंत्री श्री. छगन भुजबळ यांनी सांगितले.

भूसंपादनाची समस्या जमीन मालकांशी चर्चा करुन सोडविणार

इगतपुरी तालुक्यातील घोरपडेवाडी गावाजवळ उर्ध्व कडवा बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पाअतंर्गत 860 मी. लांबीचे व 21.80 मी. उंचीचे मातीचे धरण प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत धरणाच्या बुडीत क्षेत्राचे सर्वेक्षण व सिमांकन, भांडारगृह, चौकीदार निवासस्थान, धरणाकडे जाणारा रस्ता आदी.कामे पूर्ण झाली असून बुडीत क्षेत्र व धरण पायाच्या बाधित शेतकऱ्यांचा भूसंपादनास विरोध आहे. त्यामुळे उर्ध्व कडवा प्रकल्पाच्या भूसंपादनाची समस्या जमीन मालकांशी चर्चा करुन सोडविण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहे.