केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लिखित उत्तराद्वारे आज राज्यसभेत सांगितले की, ओपेक अर्थात पेट्रोलियम उत्पादने निर्यातदार संघटनेचे प्रमुख प्रकाशन असलेल्या वर्ल्ड ऑईल आउटलुक 2021 मध्ये असे म्हटले आहे की वर्ष 2045 पर्यंत भारतातील तेलाची मागणी प्रतिदिन 11 दशलक्ष बॅरल इतकी वाढेल अशी अपेक्षा आहे. सद्यस्थितीला देशात प्रतिदिन 4.9 दशलक्ष बॅरल तेलाची गरज भासते आहे.
देशाला उर्जा सुरक्षितता प्रदान करण्याच्या दृष्टीने सरकार तामिळनाडूसह सर्वच राज्यांमध्ये देशांतर्गत तेल उत्पादन वाढविण्यासाठी विविध पावले उचलत आहे, यामध्ये आयात स्त्रोतांसाठी नव्या देशांकडे आणि प्रदेशांकडे वळणे तसेच इथेनॉल मिश्रण कार्यक्रम, किफायतशीर वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय यांसारख्या योजनांच्या माध्यमातून इथेनॉल, कॉम्प्रेस्ड बायोगॅस, हायड्रोजन इत्यादी नव्याने उदयाला येत असलेल्या इंधन प्रकारांच्या वापरातून पारंपरिक हायड्रोकार्बन इंधनाला पर्याय ठरणारे विविध उर्जा स्रोत स्वीकारणे यांचा समावेश आहे.
त्याचसोबत, कच्च्या तेलाच्या दरातील अस्थिरतेबाबत भारताला वाटणारी गंभीर चिंता तसेच तेलाचे ग्राहक असलेल्या देशांसाठी अधिक जबाबदार आणि योग्य दर मिळण्याबाबतचा भारताचा आग्रह, कच्चे तेल उत्पादन करणारे देश, पेट्रोलियम उत्पादने निर्यातदार संघटना आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील इतर संबंधित मंचांच्या प्रमुखांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकार द्विपक्षीय चर्चेचा मार्ग अनुसरत आहे अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिली.