नागपूरच्या नीरी संस्थेने विकसित केले मीठाच्या पाण्याने गुळण्यांच्या माध्यमातून कोविड आरटी-पीसीआर चाचणी करणारे अभिनव रुग्ण-स्नेही उपकरण
कोविड-19 महामारीचा जगभर उद्रेक झाल्यापासूनच, भारतात या आजाराच्या चाचण्या करण्यासाठीच्या पायाभूत क्षमता आणि चाचणी क्षमता वाढवण्यासाठी विविध स्तरांवरुन प्रयत्न सुरु आहेत. नागपूरची राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) च्या मार्गदर्शनाखाली, या चाचण्यांच्या संशोधन प्रवासात आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. या संस्थेने कोविड-19 च्या नमुना चाचणीसाठी ‘मिठाच्या पाण्याच्या गुळण्यातून होणारी आरटी-पीसीआर पद्धत’ शोधून काढली आहे.
अनेक लाभ असलेली पद्धत : सुलभ, जलद, सहज, किफायतशीर
गुळण्या करण्याच्या पद्धतीचे अनेक लाभ आहेत, सगळे लाभ या एका छोट्या उपकरणातून मिळतात. हे उपकरण अत्यंत सुलभ, जलद, किफायतशीर, रुग्ण-स्नेही आणि आरामदायक आहे.या उपकरणामुळे जलद निकाल मिळतात आणि ग्रामीण आणि आदिवासी भागांसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे कारण, या चाचणीसाठी किमान पायाभूत सुविधांची गरज असते.
पत्र सूचना कार्यालयाशी बोलतांना, नीरीच्या पर्यावरणीय विषाणू संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ कृष्णा खैरनार म्हणाले, “स्वॅब गोळा करण्याच्या पद्धतीला वेळ लागतो. त्यापेक्षाही अधिक महत्वाचे म्हणजे, हे आत साधन घालून, स्वॅब काढण्याचे तंत्रज्ञान असल्याने, रुग्णांसाठी ते जरा त्रासदायक असते. त्याशिवाय, काही दुर्गम, ग्रामीण भागातून, गोळा केलेले नमुने संकलन केंद्रांत आणण्यासाठी वेळ जातो. दुसरीकडे मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याची आरटी-पीसीआर पद्धत ही जलद, आरामदायक आणि रुग्ण-स्नेही पद्धत आहे. त्याचे नमुने लगेच संकलित केले जातात आणि निष्कर्ष तीन तासांत मिळू शकतात.”
रुग्ण स्वतःही नमुने गोळा करु शकतात.
ही पद्धत, आतमध्ये काही उपकरण घालून स्वॅब नमुने घेण्याची पद्धत नाही. ती अत्यंत सुलभ पद्धत आहे, जी वापरून, रुग्ण स्वतःच आपले नमुने गोळा करू शकतो, अशी माहिती खैरनार यांनी पुढे दिली. “नाकातून आणि तोंडातून स्वॅब संकलित करण्यासाठी तंत्रज्ञान तज्ञांची गरज असते; शिवाय, ही पद्धत अत्यंत वेळखाऊ देखील आहे. त्याविरुद्ध, मिठाच्या पाण्यातून गुळण्या करण्यासाठी केवळ खारे पाणी असलेली नलिका वापरली जाते. गुळण्या केल्यावर रुग्णाने ते पाणी त्या नलिकेत जमा करायचे असते. हा नमुना मग प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो. तिथे सामान्य तापमानात, नीरी ने तयार केलेल्या एका विशिष्ट द्रावणात ते मिसळून ठेवले जाते. त्यानंतर जेव्हा हे द्रावण गरम केले जाते, त्यावेळी, आरएनए टेम्प्लेट तयार होते. या आरएनए मधून पुढे आरटी-पीसीआर म्हणजेच, रिव्हर्स ट्रान्सक्रीप्शन पॉलिमरेस चेन रिएक्शन (RT-PCR) प्रक्रिया केली जाते.नमुना संकलनाच्या आणि प्रक्रियेच्या या विशिष्ट पद्धतीमुळे आरएनए वेगळे काढण्याच्या महागड्या प्रक्रियासाठी लागणाऱ्या खर्चाची बचत होते.
या पद्धतीत लोक स्वतः चाचणी करु शकतात, कारण यात स्वतः नमुने गोळा करण्यास संमती आहे.” ही पद्धत पर्यावरण स्नेही देखील आहे कारण त्यात कमीतकमी कचरा निर्माण होतो.
ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये चाचण्यांसाठी वरदान
ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये, जिथे पायाभूत सुविधांची कमतरता आहे, तिथे चाचण्यांसाठी ही अभिनव चाचणी प्रक्रिया विशेष उपयुक्त ठरेल, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. या तंत्रज्ञान-विरहित (non-technique) चाचणी पद्धतीला आयसीएमआर म्हणजेच, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची मान्यता मिळाली आहे. हे तंत्रज्ञान देशभरात सगळीकडे वापरता यावे, यासाठी नीरीने या चाचण्यांचे प्रशिक्षण इतर प्रयोगशाळांमधील तंत्रज्ञाना द्यावे, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.
नागपूर महानगरपालिकेनेही,या पद्धतीनुसार चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे, त्यानुसार, मान्यताप्राप्त प्रोटोकॉलनुसार, नीरीने चाचण्या घेणे सुरु केले आहे.
“देशभरात हे तंत्रज्ञान वापरण्याची गरज”
नीरीच्या पर्यावरणीय विषाणू विभागातील सर्व शास्त्रज्ञ, संशोधक आणि तंत्रज्ञासह इतर सर्व कर्मचारी आणि प्रयोगशाळा
सहाय्यकांनी अत्यंत कठोर परिश्रम केले आहेत. विदर्भात रुग्णसंख्या वाढली असतांना त्यांच्या अथक प्रयत्नांतूनच हे पर्यावरणपूरक, रुग्णस्नेही तंत्रज्ञान विकसित होऊ शकले. जर या पद्धतींचा वापर राष्ट्रीय पातळीवर करण्यात आला, तर लोकांना जलद, नागरिकस्नेही, आणि लवकरात लवकर निष्कर्ष शोधून देता येईल,अशी पद्धत मिळू शकेल. यातून आपली कोरोनाविरुध्दची लढाई आणखी बळकट होण्यास मदत होईल.