रुग्ण मृत्यूदर 2.38% टक्के असून त्यात सातत्याने घट सुरु
देशातील कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा एका दिवसातील दर गेले सलग तीन दिवस वाढतो आहे. सलग तिसऱ्या दिवशी, म्हणजे गेल्या 24 तासांत कोविडचे 34,602 उपचारानंतर बरे झाले आहेत.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची आतापर्यंतची संख्या आठ लाखांच्या वर गेली असून सध्या ती 8,17,208 एवढी आहे. परिणामी कोविड रुग्ण बरे होण्याचा दर, 63.45%पर्यंत पोहोचला आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने देशातील सक्रीय रुग्णांच्या संख्येपेक्षा आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,77,073 ने अधिक आहे.तसेच ही तफावत सातत्याने वाढते आहे. आज देशात 4,40,135 सक्रीय रुग्ण आहेत.
राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सरकारांच्या प्रयत्नांना केंद्रातील तज्ञांच्या पथकांची मदत आणि मार्गदर्शन मिळाले आहे. ज्या ज्या ठिकाणी रुग्णसंख्या अधिक होती, त्या भागातल्या राज्य आणि जिल्हास्तरातील अधिकाऱ्यांशी केंद्र सरकारने व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केलेल्या चर्चेची आणि त्यानुसार सबंधित भागात पथके पाठवण्याच्या धोरणाचीही कोविड व्यवस्थापनात मदत झाली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून रुग्ण मृत्यूदर सातत्याने कमी होत आहे. सध्या हा मृत्यूदर 2.38%.इतका आहे.
घरोघरी सर्वेक्षण
कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी, केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी तयार केलेल्या सुनियोजित धोरणांच्या अंमलबजावणीमुळे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढतो आहे.
या धोरणानुसार, चाचण्यांची संख्या वाढवून तसेच घरोघरी सर्वेक्षण करत लवकरात लवकर रुग्ण शोधणे, SARI आणि ILI या फ्लूसदृश रुग्ण असलेल्या भागात सर्वेक्षण, संपर्क शोधणे, आजाराचा संसर्ग होण्याचा अधिक धोका असलेल्या रुग्णांचा शोध अशा उपाययोजनांचा समावेश आहे.
त्यासोबतच, तीन स्तरीय आरोग्य पायाभूत सुविधा उभारून, त्याद्वारे कोविड प्रतिबंधनाच्या प्रभावी उपाययोजना आणि वैद्यकीय व्यवस्थापन करणे, तसेच उपचारासाठीच्या प्रमाणित कार्यान्वयन पद्धतींचा वापर करण्यात आला. त्याशिवाय, रूग्णालयांमध्ये प्रभावी उपचार आणि काही रुग्णांचे गृह अलगीकरण केल्यामुळे रुग्णालयांवरचा ताणही कमी करण्यात आला तसेच गंभीर रूग्णांसाठी रुग्णालये उपलब्ध राहिली.