दैनंदिन पातळीवरील नव्या बाधितांची संख्या सलग 11व्या दिवशी 2 लाखांहून कमी
भारतात गेल्या 24 तासांच्या कालावधीत 1,00,636 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली. गेल्या दोन महिन्यांतील रुग्णसंख्येचा हा नीचांक आहे. गेले सलग 11 दिवस देशात दैनंदिन पातळीवर नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 2 लाखांहून कमी आहे. “संपूर्णतः सरकार” दृष्टीकोनाअंतर्गत केंद्र सरकार आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारे यांनी केलेल्या एकत्रित आणि शाश्वत प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
भारतात सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत आता सतत घसरण दिसून येत आहे. देशातील सक्रीय कोविड बाधितांची संख्या आज सलग दुसऱ्या दिवशी 15 लाखांपेक्षा कमी म्हणजे 14,01,609 असल्याचे दिसून आले. ही रुग्णसंख्या सलग 7 व्या दिवशी 20 लाखांपेक्षा कमी आहे.
गेल्या 24 तासांच्या कालावधीत सक्रीय रुग्णसंख्येत एकूण 76,190 ने घट झाली आणि देशातील सध्याची सक्रीय रुग्णसंख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या केवळ 4.85% इतकी आहे.
भारतात अधिकाधिक लोक कोविड-19 आजारातून बरे होत असल्यामुळे देशात दैनंदिन पातळीवर नव्याने रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या सलग 25 व्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. गेल्या 24 तासांत 1,74,399 रुग्ण कोविडमधून मुक्त झाले.
गेल्या 24 तासांत दैनंदिन पातळीवर नव्याने संसर्ग होणाऱ्या रुग्णांपेक्षा रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या 73,763 ने अधिक होती.
महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोना आजार झालेल्यांपैकी 2,71,59,180 व्यक्ती कोविड -19 मधून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे एकूण रोगमुक्ती दर 93.94% झाला असून या दराचा चढता कल आता दिसून येत आहे.
गेल्या 24 तासांत देशात एकूण 15,87,589 चाचण्या करण्यात आल्या आणि भारताने आतापर्यंत एकूण 36 कोटी 60 लाखांहून अधिक (36,63,34,111) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
एकीकडे देशात चाचण्यांचे प्रमाण वाढविले जात असतानाच दुसरीकडे पॉझिटीव्हिटी दरात सतत घसरण सुरु असल्याचे दिसते आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 6.34% इतका आहे. हा दर सलग 14 व्या दिवशी 10% हून कमी राहिला आहे.
लसीकरणाच्या आघाडीवर बघितले तर, देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 23 कोटी 27 लाख मात्रा दिल्या गेल्या आहेत.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, देशात 32,68,969 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 23,27,86,482 मात्रा देण्यात आल्या आहेत.