राज्यात ओमायक्रॉनची लाट झपाट्याने आली व त्याच वेगाने खाली आल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील कोरानाच्य सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल ६० हजारांनी घटली आहे. हे त्याचेच निदर्शक आहे. दुस-या लाटते एवढ्या मोठ्या संख्येची घट होण्यास तब्बल ८ आठवडे लागले होते.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. ७ ते १३ फेब्रुवारी या आठवड्यात सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल ६० हजारांनी घटली आहे. राज्यात ७ फेब्रुवारीला सक्रिय रुग्णांची संख्या १.०६ लाख इतकी होती. तर १४ फेब्रुवारीला हीच संख्या ४५,९०५ इतकी होती. सध्या असलेले सक्रिय रुग्ण हे गेल्या लाटेतील सप्टेंबरमध्ये होते तितकेच आहेत. मात्र सध्या एका आठवड्यात झालेली घट ही गेल्या लाटेच्या तुलनेत कितीतरी वेगाने झाली आहे.
गेल्या वर्षी जुलैच्या मध्यात राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १.०४ लाख इतकी होती. ही संख्या सुमारे ६० हजारांनी कमी होण्यासाठी तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागला. ही संख्या १८ सप्टेंबर २०२१ ला ४७,९१९ इतकी होती. मात्र, तिस-या लाटते ही घट होण्यासाठी केवळ एक आठवडा लागला आहे. प्रौढांमधील वाढलेले लसीकरण हे या मागील कारण आहे, असे मत आयसरच्या शास्त्रज्ञ डॉ. विनीता बाळ यांनी व्यक्त केले. त्याच प्रमाणे लक्षणेविरहित रुग्ण कोरोना चाचणी करत नाहीत, किंवा सरकारच्या नियमावलीनुसार अशा रुग्णांना चाचणीची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांची कोरोनाबाधितांमध्ये नोंद झालेलली नाही. ही कारणे देखील सक्रिय रुग्णांच्या घटत्या संख्येत महत्त्वाची असल्याचे त्या म्हणाल्या.
तर ज्युपीटर हॉस्पिटलचे डॉ. अजय ठक्कर म्हणाले, “दीड महिन्यांपूर्वी हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी आलेल्या १० रुग्णांपैकी ६ ते ७ रुग्ण कोरोनाबाधित आढळत होते. आता प्रमाण एकवर आले आहे. याववरून कोरोनाची लाट झपाट्याने ओसरत आहे. माझ्या मते भारतातील कोरोना आता महासाथ न राहता स्थानिक साथ झाला आहे. तो त्याच्या मूळ ठिकाणी न जाता कायम आपल्यासोबत राहणार आहे.” तर सौम्य लक्षणांमुळे रुग्ण झपाट्याने बरे होत आहेत. याचाही परिणाम सक्रिय रुग्णांच्या संख्येवर झाला आहे.