महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचा वाढता आकडा आणि म्युटंट स्ट्रेन एन440के आणि ई484क्यू यांचा थेट संबध नाही: आयसीएमआर
महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचा वाढता आकडा आणि कोविड 19 च्या म्युटंट स्ट्रेन एन440 के आणि ई484 क्यू यांचा थेट संबध नाही. कोविड 19 शी संबधित साप्ताहिक पत्रकार परिषदेत आज आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी हे स्पष्ट केले.
हे दोन विषाणूंचे स्ट्रेन इतर देशांमध्येही सापडले आहेत आणि ते भारतापुरतेच मर्यादित नाहीत असे भार्गव यांनी पुढे सांगितले. शिवाय, ते यापूर्वी भारतातील काही राज्यांमध्ये देखील आढळले आहेत. मार्च आणि जुलै 2020 च्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातील चार क्रमांमध्ये E484Q चे स्ट्रेन सापडले होते. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि आसाममध्ये मे आणि सप्टेंबर 2020 दरम्यान 13 वेगवेगळ्या प्रसंगी एन440 के म्युटंटची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील सध्या वाढत असलेला रुग्णांचा आकडा आणि सध्या चर्चेत असलेल्या म्युटंटचा काहीही संबध नाही.
असे असले तरीदेखील , परिस्थितीवर सतत नजर ठेवले जात आहे. पुढील वैज्ञानिक पुरावे हाती आल्यानंतर त्यांची माहिती देण्यात येईल असे त्यांनी सांगितले .