“गरोदर महिला आणि स्तनदा मातांनी कोविड लस घेतल्यास त्यांच्यासह त्यांचा गर्भ आणि बाळांचेही विषाणूपासून संरक्षण होईल”
कोविड-19 चा बालकांवर होणारा परिणाम, त्यांच्या संरक्षणाची गरज तसेच गरोदर महिला आणि स्तनदा मातांच्या लसीकरणासह, लोकांच्या मनात कोविडविषयी असलेल्या विविध शंकाकुशंका आणि प्रश्नांना, दिल्लीच्या लेडी हार्डिंग्ज वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालचिकित्सा विभागाचे संचालक डॉ. प्रवीण कुमार यांनी उत्तरे दिली आहेत.
- या महामारीचा बालकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर कसा परिणाम झाला आहे? त्यांच्यावर होणारा दीर्घकालीन परिणाम कमी करण्यासाठी काय करण्याची गरज आहे?
उत्तर : या महामारीचे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर अनेक परिणाम संभवू शकतात. मुले जवळपास एका वर्षापासून घरात कोंडली गेली आहेत. त्याशिवाय, घरातील आजारपणे, पालकांचा रोजगार/नोकरी गेली असल्यास त्याचाही तणाव त्यांच्या मनावर येऊ शकतो. मुले आपली ही वेगळी मानसिक अवस्था (दुःख) वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करु शकतात, कारण प्रत्येक मुलाचा स्वभाव वेगवेगळा असतो. काही मुले गप्प राहतात तर काही राग आणि इतर काही कृत्यातून आपला तणाव व्यक्त करतात.
अशावेळी मुलांची काळजी घेणाऱ्या सर्वांनी संयम ठेवण्याची आणि त्यांच्या भावना समजून घेण्याची गरज आहे. तुमची मुले तणावात असतील, तर त्याची चिन्हे तुम्हाला त्यांच्या वर्तनातून जाणवतील, त्यांचे निरीक्षण करा. कदाचित ती खूप काळजीत असतील, किंवा दुःखी असतील. त्यांच्या खाण्यापिण्याच्या, झोपण्याच्या सवयी बदलल्या असतील. त्यांना लक्ष देण्यात, किंवा एकाग्रचित्त होण्यात अडथळे येत असतीलम त्यांना ते जमत नसेल. अशावेळी संपूर्ण कुटुंबांनेच त्यांना या ताणतणावातून बाहेर येण्यासाठी मदत करायला हवी, त्यांची अस्वस्थता समजून घ्यायला हवी.
- कोविडच्या पुढच्या संभाव्य लाटा मुलांसाठी अधिक धोकादायक ठरतील, असे आपल्याला वाटते का? मुलांना उत्तम आरोग्य सुविधा देणे, तसेच त्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने आपण, एक देश म्हणून काय तयारी कारायला हवी, असे आपल्याला वाटते?
उत्तर – आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की कोविड-19 हा एक नवा विषाणू आहे, जो आपले स्वरुप बदलू शकतो. आता भविष्यात येणाऱ्या संभाव्य लाटा मुलांवर अधिक प्रभावी ठरतील का, किंवा त्यांच्यासाठी धोकादायक असतील हे सगळे केवळ अंदाज आहेत. लोकांचा असा अंदाज आहे की पुढची लाट आली तर तोपर्यंत, म्हणजेच पुढच्या काही महिन्यांत बहुतांश प्रौढ व्यक्तींचे लसीकरण झालेले असेल, मात्र मुलांसाठी अद्याप आपल्याकडे सध्यातरी लस उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांना या लाटेचा फटका बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.
मात्र, आपल्याला या विषाणूचे भविष्यात कसे वर्तन राहील, त्याचा मुलांवर परिणाम होईल का, हे आतातरी सांगता येणार नाही. आपल्याला या संसर्गापासून मुलांचे संरक्षण करायचे आहे, एवढेच आता लक्षात घेतले पाहीजे. त्यासाठी, घरातील मोठ्या माणसांनी कोविड विषयक नियमांचे पालन करायला हवे. सामाजिक कार्यक्रम टाळायला हवेत. जेणेकरुन त्यांना संसर्ग होणार नाही आणि घरातील मुलांचेही संरक्षण होईल. तसेच घरातील सर्व प्रौढ व्यक्तींनी लस घ्यायला हवी, त्यामुळेही आपण आपल्या मुलांचे संरक्षण करु शकतो.
आणि आता तर, गरोदर महिला तसेच स्तनदा मातांसाठीही लस उपलब्ध झाली आहे. यामुळे त्यांच्यासोबतच त्यांच्या गर्भातील अर्भकांचे आणि शिशूंचेही संरक्षण होऊ शकेल.
- कोविडच्यां दुसऱ्या लाटेचा मुलांवर कसा आणि किती परिणाम झाला आहे?
दुसऱ्या लाटेचा मुलांवर समान परिणाम झाला आहे. कोविड-19 हा एक नवा विषाणू असून, त्याचे परिणाम सर्व वयोगटांवर जाणवत आहेत. कारण आज आपल्याकडे या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती नाही. एनसीडीसी/आयडीएसपी च्या डॅशबोर्ड नुसार, कोविड संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी 12 टक्के रुग्ण 20 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत.
अलीकडेच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, मुलांमध्ये देखील प्रौढ व्यक्तींइतकीच सिरो-पॉझिटिव्हीटी म्हणजेच सामूहिक प्रतिकारशक्ती आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत संसर्ग झालेल्यांची संख्या पहील्या लाटेपेक्षा अधिक असल्याने, साहजिकच तुलनेने मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाणही अधिक आहे. आतापर्यंत मुलांमधील मूत्यूचे प्रमाण प्रौढांच्या तुलनेत कमी आहे. तसेच, सहव्याधी असलेल्या मुलांमध्ये ते सर्वसाधारणपणे अधिक असल्याचे आढळले आहे.
- बालकांवर, विशेषतः ज्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले अशा बालरुग्णांवर उपचार करतांना आपल्यासमोर काय आव्हाने होती ?
उत्तर : आम्ही कोविड संक्रमित मुलांसाठी वेगळ्या खाटांची व्यवस्था केल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्याचे व्यवस्थापन आम्ही योग्यप्रकारे करु शकलो. मात्र, ज्यावेळी कोविड लाट उच्चांकी स्थितीत होती, आणि आमचे डॉक्टर्स, नर्सेस पण पॉझिटिव्ह झाल्या होत्या, त्यावेळी इतर सर्व डॉक्टरांसमोर असलेल्या आव्हानांचा आम्हालाही सामना करावा लागला.
- एमआयएस-सी काय आहे ? एमआयएस-सी च्या रुग्णांवर उपचार करतांना आपल्यासमोर आलेली आव्हाने, या रूग्णांची परिस्थिती याविषयी सविस्तर माहिती द्यावी. पालकांनी याविषयी जागृत असण्याची गरज आहे का? यावरचे उपचार काय आहेत ?
उत्तर : द मल्टीसिस्टीम इन्फेलेमेटरी सिंड्रोम (MIS) हा लहान मुलांमध्ये तसेच कुमारवयीनांमध्ये (0-19 वर्षे वयाच्या) आढळणारा एक नवा सिंड्रोम आहे. अनेक रुग्णांमध्ये कोविड संसर्ग उच्च प्रमाणात असतांना त्यानंतर दोन ते सहा आठवड्यांत हा सिंड्रोम आढळला आहे.
यासाठी तीन प्रकारची लक्षणे सांगितली आहेत: सातत्याने ताप असणे शिवाय, इन्फेलेमेटरी लक्षणे, क्लासिकल कावासाकी आजार, एलवी ची कार्यक्षमता कमी होणे इत्यादी. MIS-C चे निदान होण्यासाठी अद्ययावत तपासण्या आवश्यक असतात. सर्व संशयित रुग्णांना HDU/ICU सुविधा असलेल्या रुग्णालयात पाठवले जाते. लवकर निदान झाल्यास, अशा सर्व रूग्णांवर उपचार करणे शक्य आहे.