रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 70%
प्रतिबंधक धोरणांची यशस्वी अंमलबजावणी, आक्रमक पावलं उचलत केलेल्या व्यापक चाचण्या आणि कोविडच्या गंभीर रुग्णांवर उपचारांवेळी केलेले प्रमाणित वैद्यकीय व्यवस्थापन, या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्याने वाढ होऊन तो सुमारे 70 टक्क्यांवर पोहोचला आहे.
कोरोनाचे अधिकाधिक रुग्ण बरे होत असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडले जात आहे. तसेच लक्षणविरहीत किंवा कमी लक्षणे असलेले रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. यामुळे आतापर्यंत देशात 15,83,489 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत 47,746 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
सध्या देशभरात 6,39,929 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हे प्रमाण एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत केवळ 28.21% एवढे आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत असल्यामुळे, बरे होणारे रुग्ण आणि सक्रीय रुग्णांमधील तफावत आणखी वाढून सुमारे 9.5 लाख इतकी झाली आहे. भारताच्या टेस्ट, ट्रॅक, ट्रीट या धोरणाचे अपेक्षित सकारात्मक परिणाम दिसत असून त्यामुळेच ही तफावत वाढलेली दिसत आहे.
रुग्णालयातील सुधारित आणि परिणामकारक वैद्यकीय उपचारपद्धती, रुग्णालयात रूग्णांना आणण्यासाठीची रुग्णवाहिका सेवा सुधारुन अधिक समन्वय आणणे आणि कोविडच्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळतील, अशी व्यवस्था करणे, अशा उपाययोजना सातत्याने केल्या गेल्या. परिणामी, कोविडचा मृत्यूदर, जागतिक मृत्यूदराच्या तुलनेत सातत्याने कमी राहिला आहे. आज हा दर 2 % पेक्षा खाली जात 1.99% पोहोचला आहे.