मृत्यूदर सर्वात कमी असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश

जागतिक स्तरावर सर्वात कमी कोविड मृत्यूदर असलेल्या देशांमध्ये भारताचा मृत्यूदर 1.76 टक्के आणिक कमी होत असल्याचे स्पष्ट

जागतिक स्तरावर इतर अनेक देशांच्या तुलनेत कोविड मृत्यूदर सर्वात कमी असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. जागतिक स्तरावर कोविड मृत्यूदर 3.3 टक्के आहे. तर भारतामध्ये कोविड-19 मुळे होत असलेल्या मृत्यूदराचे प्रमाण 1.76 टक्के आहे.

प्रति दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर जागतिक पातळीच्या तुलनेमध्ये भारताचा मृत्यूदर सर्वात कमी आहे. जागतिक सरासरी आकडेवारीनुसार प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे 110 जणांचा मृत्यू कोविडमुळे होत आहे. तर भारतामध्ये हा आकडा 48 आहे. ब्राझील आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या  तुलनेने जास्त म्हणजे अनुक्रमे 12 आणि 13 पट जास्त मृत्यू कोविडमुळे होत आहेत.

कोविड व्यवस्थापन आणि प्रतिसाद धोरणाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. कोविडसंबंधित मृत्यू कसे कमी करता येतील तसेच कोविडच्या गंभीर रूग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा देवून त्यांचा जीव कसा वाचवता येईल, याकडे सरकारच्यावतीने लक्ष दिले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्या सहकार्याने आणि एकत्रित प्रयत्नांमुळे देशभरामध्ये आरोग्य सुविधा बळकट करण्यात आल्या आहेत. देशभरामध्ये 1578 कोविड समर्पित रूग्णालयांमध्ये दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यात येत आहेत. केंद्र सरकारने रुग्णलयात देण्यात येणा-या उपचारांचा ‘प्रोटोकॉल’ निश्चित केला आहे, त्या प्रमाणिकरणानुसार रुग्णावर उपचार करण्यासंबंधी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.

कोविडच्या गंभीर रूग्णांच्या वैद्यकीय व्यवस्थापनामध्ये अति दक्षता विभागामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या क्षमता वृद्धीसाठी एक अनोखा उपक्रम नवी दिल्लीच्या एम्सच्यावतीने सुरू करण्यात आला आहे. या ‘ई-आयसीयू’ उपक्रमामध्ये देशभरातल्या कोविड अति दक्षता विभागातल्या वैद्यकीय कर्मचारी वर्गाला समाविष्ट करून घेण्यात येत आहे. आठवड्यातून दोन वेळा- मंगळवारी आणि शुक्रवारी राज्यांमधल्या अति दक्षता विभागामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांसाठी टेली-व्हिडिओ कन्सलटेशनचे सत्र आयोजित करण्यात येत आहे. दि. 8 जुलै,2020 पासून या सत्रांना प्रारंभ करण्यात आला आहे.

आत्तापर्यंत अशा प्रकारची 17 दूर-सत्रे झाली असून त्यामध्ये 204 वैद्यकीय संस्थांनी सहभाग नोंदवला आहे.

कोविडच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी अति दक्षता विभागातल्या डाॅक्टरांची वैद्यकीय व्यवस्थापन क्षमता वृद्धीसाठी आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने नवी दिल्लीच्या एम्सच्यावतीने वारंवार विचारण्यात येणा-या प्रश्नांना नेमकी उत्तरे तयार केली आहेत.

अति दक्षता विभागामध्ये कोविडच्या गंभीर रुग्णांची काळजी घेणा-या आणि वैद्यकीय व्यवस्थापन करणा-या तज्ज्ञांना आलेल्या अनुभवांचे संकलन करून तसेच त्या विषयीची माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उपचार करणा-या डाॅक्टरांना रूग्णांच्या स्वभावानुसार अनेक अनुभव येतात तसेच प्रत्येक रुग्णांच्या प्रकृतीनुसार त्यांच्यापुढे वैद्यकीय आव्हाने येत असतात. रूग्णांवर उपचार करताना त्यांना रोज येणा-या नवनवीन समस्या जाणवत असतात. त्यांच्या सर्व नोंदी लक्षात घेवून त्यानुसार उपचार पद्धतीमध्ये अद्यतन केले जात आहे.