महाराष्ट्र आणि पंजाब इथे सातत्याने वाढत असलेल्या कोविड-19 रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील बहु-शाखीय वैद्यकीय तज्ञांची पथके या राज्यांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यांच्या आरोग्य विभागांना कोविड-19 सर्वेक्षण, नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी ही पथके मदत आणि मार्गदर्शन करतील.
महाराष्ट्रासाठीच्या उच्च स्तरीय पथकाचे नेतृत्व, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे प्रमुख, डॉ पी रवीन्द्रन करतील तर पंजाबमध्ये जाणाऱ्या पथकाचे नेतृत्व राष्ट्रीय आरोग्य नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ एस के सिंग करतील.
ही पथके त्वरित राज्यांना भेट देणार असून राज्यातल्या कोविड हॉटस्पॉटची पाहणी करणार आहेत. तसेच कोविड संक्रमण वाढण्यामागची कारणे ते शोधून काढतील. त्यानंतर आपल्या निरीक्षणांविषयी ते मुख्य सचिव/आरोग्य सचिवांशी चर्चा करतील तसेच त्यावर राज्यातील आरोग्य विभागांनी काय उपाययोजना करायला हव्यात, याचाही सल्ला देतील.
केंद्र सरकारने, कोविड महामारीविरुद्ध लढा देतांना “संपूर्ण सरकार’ आणि ‘संपूर्ण समाज’असा व्यापक दृष्टीकोन ठेवला असून सहकार्यात्मक संघराज्य तत्वानुसार, या संकटाचा मुकाबला करत आहे. कोविड व्यवस्थापनात विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे प्रयत्न अधिक बळकट करण्यासाठी, केंद्र सरकारने वेळोवेळी केंद्राची पथके विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशात पाठवली आहेत. ही पथके राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करुन कोविडच्या आव्हानाची नेमकी आणी प्रत्यक्ष माहिती घेतात. जेणेकरुन त्याचा सामना करतांना येणाऱ्या अडचणी दूर केल्या जाऊ शकतील. या केंद्रीय पथकांचे अहवाल राज्यांनाही पाठवले जातात, ज्याच्या आधारावर राज्ये आपली पुढची उपाययोजना करु शकतील. राज्यांनी केलेल्या उपाययोजनांवर केंद्रीय आरोग्य विभाग देखरेख ठेवत असतो.