आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषदेने प्रायोजित केलेला “वैविध्यपूर्ण नारळ आणि सुपारी बागांमधील परिसंस्था सेवा विषयक विश्लेषण” या विषयावरील 10 दिवस कालावधीचा अभ्यासवर्ग गोव्यातील जुना गोवा परिसरात आयसीएआर-सीसीएआरआय अर्थात केंद्रीय तटवर्ती कृषी संशोधन संस्था येथे संपन्न झाला. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन अशा मिश्र पद्धतीने 21 फेब्रुवारी 2022 ते 02 मार्च 2022 या कालावधीत घेण्यात आलेल्या या अभ्यासवर्गात 13 सहभागी प्रत्यक्ष हजार होते तर इतर 13 जणांनी ऑनलाईन पद्धतीने या वर्गात भाग घेतला.
या प्रशिक्षण वर्गाचा समारोप समारंभ 2 मार्च 2022 रोजी संस्थेच्या परिसरात मिश्र पद्धतीने पार पडला. नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन संस्थेचे उप महासंचालक डॉ.एस.के.चौधरी हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी नारळ तसेच सुपारी पिकांच्या परिसंस्था सेवा आणि व्यवस्थापन पद्धती आणि या परिसंस्था सेवांच्या प्रमाण आणि मूल्यमापनासाठी आवश्यक प्रक्रियांबाबत विचार प्रवर्तक भाषण केले.
प्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.नरेंद्र प्रताप सिंग सन्माननीय अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांनी कोकण किनारपट्टीवर असलेल्या कुळागार बागा आणि गुंतागुंतीच्या कृषीसंबंधित परीसंस्थांच्या अभ्यासातील क्लिष्ट भागाबद्दल त्यांचे मत नोंदविले. आयसीएआर-सीसीएआरआयचे संचालक डॉ. प्रवीण कुमार यांनी या अभ्यासवर्गाबद्दल विवेचन केले आणि परिसंस्था सेवा विषयक अभ्यासाची भविष्यातील दिशा स्पष्ट केली.
या अभ्यासवर्गाचे संचालक डॉ.व्ही अरुणाचलम यांनी या वर्गाविषयी थोडक्यात अहवाल दिला. अभ्यासवर्गाचे समन्वयक डॉ.परमेश व्ही. यांनी आभारप्रदर्शन केले तर अभ्यासवर्गाचे दुसरे समन्वयक डॉ.उथप्पा ए.आर.यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या अभ्यासवर्गात सहभागी झालेल्या व्यक्तींसह आयसीएआर-सीसीएआरआयचे सर्व शास्त्रज्ञ, प्रशासकीय,आर्थिक,तंत्रज्ञान हे विभाग, मदतनीस आणि प्रकल्पसंबंधित कर्मचारी वर्ग या सर्वांनी या कार्यक्रमात भाग घेतला.