2021-22 च्या उन्हाळी हंगामासाठी कृषीसंबंधी राष्ट्रीय परिषदेला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र कुमार तोमर म्हणाले की, उन्हाळी पिके केवळ अतिरिक्त उत्पन्नच देत नाहीत तर शेतकऱ्यांसाठी रब्बी आणि खरीप हंगामादरम्यान रोजगाराच्या संधीही निर्माण करून उत्पादनही वाढवतात. कडधान्ये, भरड धान्ये, पोषक तृणधान्ये आणि तेलबिया यांसारख्या उन्हाळी पिकांच्या लागवडीसाठी सरकारने विविध कार्यक्रमांद्वारे नवीन उपक्रम हाती घेतले आहेत. उन्हाळी हंगामादरम्यान निम्म्याहून अधिक लागवड क्षेत्र कडधान्ये, तेलबिया आणि पौष्टिक तृणधान्याखाली असले तरी सिंचनाच्या स्रोतांच्या सहाय्याने शेतकरी उन्हाळी हंगामात भात आणि भाजीपाला लावतात. भातासह उन्हाळी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र 2017-18 मधील 29.71 लाख हेक्टर वरून 2.7 पटीने वाढून 2020-21 मध्ये 80.46 लाख हेक्टर झाले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
मागील पीक हंगामातील पीक कामगिरीचा आढावा आणि मूल्यांकन करणे आणि राज्य सरकारांशी सल्लामसलत करून उन्हाळी हंगामासाठी पीकनिहाय लक्ष्य निश्चित करणे हा या परिषदेचा उद्देश आहे. पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सामग्रीचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब सुलभ करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मोठ्या प्रमाणात आयात कारवी लागत असलेल्या तेलबिया आणि डाळींचे उत्पादन वाढवण्याला सरकारचे प्राधान्य आहे.
कृषीमंत्री तोमर यांनी राज्यांना त्यांच्या खतांच्या आवश्यकतेबाबत आगाऊ नियोजन करण्यास आणि केंद्र सरकारकडे खताचा अंदाज कळवण्यास सांगितले जेणेकरुन खत विभाग वेळेवर पुरेसा खत साठा देऊ शकेल. राज्यांनी एनपीके आणि द्रवरूप युरियाचा वापर वाढवावा आणि डीएपी खतांवरील अवलंबित्व कमी करावे अशी सूचनाही त्यांनी केली.