कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाची रंगीत तालीम यशस्वी

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने दि. 28 आणि 29 डिसेंबर रोजी देशातल्या चार राज्यांमध्ये कोविड-19 लसीकरण कार्यक्रम कसा राबवायचा, याची रंगीत तालिम यशस्वी करण्यात आली. यामध्ये आसाम, आंध्र प्रदेश आणि पंजाब आणि गुजरात या चार राज्यांचा समावेश आहे.

यूआयपी म्हणजेच वैश्विक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आणि संपूर्ण देशभरामध्ये व्यापक स्तरावर लसीकरण मोहीम हाती घेण्याची आवश्यकता आहे. देशात ज्याप्रमाणे एमआर -गोवर-कांजिण्या तसेच  जेई म्हणजेच मेंदूज्वर यासारख्या आजारांवर लसीकरण मोहिमा आयोजित करण्यात आल्या आहेत, त्या अनुभवाच्या आधारे  लोकसंख्येचा विचार करून लसीकरण करताना प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत. यामध्ये कोविड-19 विरोधातली लस देताना सर्वात प्रथम आघाडीवर कार्य करणारे आरोग्य कर्मचारी, आघाडीचे कामगार आणि 50 वर्षावरील व्यक्तींचा आधी विचार करण्यात येणार आहे.

कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाची रंगीत तालीम करण्याचा उद्देश म्हणजे, लसीकरण कार्यक्रमाची प्रक्रिया निश्चित करताना त्याचे नियोजन आणि पूर्वतयारी करणे, त्याचबरोबर प्रत्यक्षात कार्यक्रम राबविताना आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे, लसीकरणासाठी सोई-सुविधांची निर्मिती करणे, यासाठी सीओ-डब्ल्यूआयएन (को-विन) अर्ज उपलब्ध करून देणे, ज्या भागात लसीकरण करायचे आहे, त्या स्थानांच्या नोंदी, तिथे आवश्यक असणारे आरोग्य दक्षता कर्मचारी (एचसीडब्ल्यू) यांची माहिती अपलोड करणे, जिल्ह्यांना किती लस देण्याची आवश्यकता आहे, त्यापैकी किती दिल्या, किती लसींचे  वितरण झाले, या संदर्भातले नियोजन, लसीकरण करणा-या पथकाला तैनात करणे,  ज्या भागामध्ये लसीकरण सुरू आहे, तेथे लसीचा पुरवठा सुरळीत ठेवणे, या संपूर्ण कामाचा आढावा घेणे, अशा पद्धतीने लसीकरणाच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात आली. हा संपूर्ण कार्यक्रम ‘को-विन’ या आयटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष कार्यापूर्वी सर्व गोष्टींचे नियोजन करण्याच्या उद्देशाने या रंगीत तालिमीचे आयोजन करण्यात आले होते.

लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध कार्यासाठी विशिष्ट पथके तयार करण्यात आली  आणि डमी लाभार्थी डेटा तयार करून तो अपलोड करणे, स्थळ निर्मिती, लसीचे वितरण, लसीविषयीचा तपशील लाभार्थीला देणे, इत्यादी कामे यावेळी करण्यात आली.

या रंगीत तालमीनंतर मिळालेल्या अभिप्रायांचा आणि आलेल्या प्रतिक्रियांचा विचार करून प्रत्यक्ष लस देण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात येणार आहेत. यामुळे कोविड-19 लसीकरण कार्यक्रम प्रत्यक्ष राबविण्यास बळकटी येणार आहे.