मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अपूर्ण कामे लवकरच पूर्ण करणार

मागील दोन वर्षात कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे झालेल्या लॉकडाऊन आणि अपुरा निधी यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काही मंजूर कामे अपूर्ण आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत. ही मंजूर कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत दिली.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामे पूर्ण झाली नसल्याबाबतची लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य संजय दौंड यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी ही माहिती दिली.

ग्रामविकास राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले, सन 2018-19 मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (संशोधन व विकास) अंतर्गत ही कामे मंजूर करण्यात आली होती. या कामांवर आतापर्यंत 9.42 लक्ष इतका खर्च झाला आहे. ही कामे प्रगतीपथावर असून 3 कामांपैकी 2 कामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान लॉकडाऊनमुळे राज्याच्या आर्थिक विकासावर मर्यादा आल्या आणि त्यामुळे पूर्ण निधी उपलब्ध होऊ शकला नाही. ही कामे सुरु झाली असून या कामांची राज्य गुणवत्ता निरिक्षक (SQM) यांनी वेळोवेळी पाहणी केली आहे. याअंतर्गत उत्कृष्ट दर्जाची कामे करण्यात येत आहेत. ही अपूर्ण राहिलेली कामे मे 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असेही श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितले.

या लक्षवेधी सूचनेमध्ये सदस्य सर्वश्री अनिकेत तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहभाग घेतला.