मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दहावीच्या परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदन

प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या यशाचा आनंद मोठा, भावी वाटचालीस शुभेच्छा

मुंबई, दि. 29:- दहावीची परीक्षा शिक्षणाच्या वाटचालीतील एक टप्पा आहे. या टप्प्यावर प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या यशाचा आनंद निश्चित मोठा असतो. त्यासाठी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच या सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी अभिनंदन संदेशात म्हटले आहे की, कोणत्याही वाटचालीत एक महत्त्वाचा   टप्पा असतो. तशी ही दहावीची परीक्षा एक टप्पा आहे. त्यामध्ये क्षमता सिद्ध करण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक प्रय़त्न करता. अशा प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या यशाचा आनंद हा निश्चितच मोठा असतो. त्यामुळे या प्रयत्नांसाठी आणि यशासाठी तुमचे आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन. तसेच भावी वाटचालीसाठीही शुभेच्छा.

काहींना या परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नसेलही. त्यांनी आणखी प्रयत्न करावेत. यश तुमचेच असेल, गरज असेल, ती फक्त आणखी जोमाने  प्रयत्न करण्याची. त्यासाठीही शुभेच्छा. निकाल काहीही असेल तो आनंदाने स्वीकारा. शिक्षणाने आपण समाजाचा, देशाचा विकास घडवून आणू शकतो. त्यासाठी कटिबद्ध राहूया.