Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशभरात महात्मा गांधी नरेगाअंतर्गत स्वच्छ हरित ग्राम सप्ताह

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, या 75 आठवड्यांच्या दीर्घ उत्सवाचा एक भाग म्हणून, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी  महात्मा गांधी नरेगाअंतर्गत 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2021 या दरम्यान एक आठवड्याचा स्वच्छ हरित ग्राम  उपक्रम आयोजित केला. स्वच्छ हरित ग्राम सप्ताहादरम्यान, कचऱ्यातून संपत्तीनिर्मिती अंतर्गत उपक्रम जसे की गांडूळखत, टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर, अजैविक कचऱ्यावर प्रक्रिया आणि  शोषखड्डे, गांडूळखत/ नॅडेप खड्डे  बांधणे, यावर भर देण्यात आला.

या उपक्रमात देशभरातील ग्रामस्थांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला. आठवडाभरात ग्रामपंचायतींमध्ये विविध बैठका, कार्यशाळा आणि प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांद्वारे 1,970 कार्यक्रमांची   नोंद झाली, ज्यामध्ये 2,597 कचऱ्यातून संपत्ती निर्मिती  उपक्रम पूर्ण करण्यात आले तसेच 8,887  शोषखड्डे आणि 2,262 कंपोस्ट खड्डे  पूर्ण झाल्याची नोंद करण्यात आली.

ग्रामपंचायतींना त्यांच्या गावातील स्वच्छतेचे महत्त्व पटावे, ग्रामस्थांचे  जीवनमान सुधारू शकणारी कामे त्यांनी हाती घ्यावीत यासाठी  शिक्षित आणि प्रोत्साहित करण्याकरिता  ग्रामीण विकास मंत्रालयाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (MGNREGS) माध्यमातून विविध पावले उचलली आहेत.   शोषखड्डे बांधणे, घनकचरा व्यवस्थापन (गांडुळखत/नॅडेप  कंपोस्ट खड्डा) आणि घनकचरा आणि  सांडपाणी व्यवस्थापन कामे  (सांडपाणी  वाहिनी, द्रव जैव खत, पुनर्भरण खड्डे, शाळा आणि अंगणवाडी शौचालये, शोषवाहिन्या, गावातील नाले  आणि स्थिरीकरण तलाव) अशी कामे हाती घेण्यावर मंत्रालयाने भर दिला होता.

Exit mobile version