सीमेवर चीनच्या चिथावणीखोर कारवाया सुरूच

भारत, वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी)सैन्य मागे घेण्यास आणि संघर्षाची तीव्रता कमी करण्यास वचनबद्ध आहे, तर चीन ती वाढविण्यासाठी चिथावणीखोर कारवाया करीत आहे.

भारतीय सैन्याने कोणत्याही टप्प्यावर वास्तविक नियंत्रण रेषा ओलांडलेली नाही किंवा गोळीबार करण्यासह कोणत्याही आक्रमक पद्धतीचा अवलंबही केलेला नाही.

मुत्सद्दी व राजकीय पातळीवर गुंतलेली कामे प्रगतीपथावर असताना, पीपल्स लिबरेशन आर्मीकडून उघडपणे करारांचे उल्लंघन केले जात असून आक्रमक उपाययोजना केली जात आहे. अलिकडेच 7 सप्टेंबर 2020 रोजी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी आपल्या एका चौकीकडे जाण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या जवानांना त्यांना रोखण्यात यश आले. आपल्या सैन्याला धमकाविण्याच्या प्रयत्नात पीएलएच्या सैन्याने हवेत काही फैरी झाडल्या. या तीव्र चिथावणीनंतरही आपल्या सैन्याने मोठा संयम, जिद्द आणि जबाबदारीचे दर्शन घडविले आहे.

भारतीय सैन्य हे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध आहे, परंतु, त्याचवेळी ते सर्व तऱ्हेने राष्ट्रीय अखंडता आणि सार्वभौमत्त्वाचे रक्षण करण्यासाठी देखील दृढ आहे.  वेस्टर्न थिएटर कमांडरने जारी केलेले निवेदन त्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.