Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा केंद्रीय पथकाकडून आढावा

औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता केंद्रीय पथक आज औरंगाबादेत दाखल झाले.  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज आयोजित बैठकीत पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यात अतिवृष्टी व पुरपरिस्थीतीमुळे झालेल्या शेतातील पिके व इतर नुकसानीची यावेळी सविस्तर माहिती सादरीकरणाव्दारे दिली.

बैठकीस केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे सहसचिव रमेशकुमार गंता, केंद्रीय अर्थ व नियोजन विभागाचे सल्लागार आर.बी.कौल, ग्रामीण विकासाचे उपसचिव यशपाल, केंद्रीय कृषी विभागाचे कृषी संचालक आर.पी.सिंह, रस्ते व दळणवळण विभाग, प्रादे‍शिक कार्यालय, मुंबईचे मुख्य अभियंता  तुषार व्यास, जलशक्ती विभागाचे अधीक्षक अभियंता एम.एस.सहारे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, महसूल उपायुक्त पराग सोमण आणि भूजल सर्व्हेशन व विकास यंत्रणा, प्रादेशिक पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, जलसंपदा, रस्ते विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग,  गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सादरीकरणानंतर पथक प्रमुख व पथकातील सदस्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.

दि. 21 डिसेंबर रोजी केंद्रीय पथकातील सदस्य औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्हयातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करणार आहे. यावेळी ते शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत. पथकातील सदस्य औरंगाबाद तालुक्यातील निपाणी, पिंपळगाव पांढरी, पैठण तालुक्यातील शेकटा, गाजीपूर, निलजगाव, गंगापूर तालुक्यातील ढोरगाव,मुरमी,वरखेड तर उस्मानाबाद जिल्हयातील उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव, पातोडा लोहारा तालुक्यातील सास्तुर, राजेगाव आणि तूळजापूर तालुक्यातील ककरंबा, आपसिंगा व कातरी या गावातील अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.

Exit mobile version