केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री आणि नौवहन मंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडवीय यांनी जीएसएफसी अर्थात गुजरात राज्य खाते आणि रसायने या कंपनीने तयार केलेल्या, ‘कॅल्शियम नायट्रेट’ आणि ‘बोरोनेटेड कॅल्शियम नायट्रेट’ या रसायनांच्या स्वदेशी प्रकारांचे व्हिडीओकॉन्फरन्सिंगद्वारे अनावरण केले. ‘कॅल्शियम नायट्रेट’ आणि ‘बोरोनेटेड कॅल्शियम नायट्रेट’ ही दोन्ही रसायने प्रथमच भारतात उत्पादित केली जात आहेत, आतापर्यंत परदेशातून त्यांची आयात केली जात होती.
कॅल्शियम नायट्रेट शेतीसाठी पाण्यात विद्राव्य खत म्हणून वापरले जाते तसेच ते सांडपाणी प्रक्रियेत आणि सिमेंटची मजबुती वाढविण्यासाठी उपयोगी पडते.
सध्या जीएसएफसीची या दोन रसायनांसाठीची वार्षिक उत्पादन क्षमता 10,000 टन इतकी आहे आणि येत्या तीन महिन्यांत टी वार्षिक 15,000 टनांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. येत्या 9 ते 12 महिन्यात ही क्षमता वाढवून 30,000 टनांपर्यंत नेली जाईल अशी माहिती मंत्र्यांना देण्यात आली.
‘कॅल्शियम नायट्रेट’ आणि ‘बोरोनेटेड कॅल्शियम नायट्रेट’ या दोन्ही रसायनांच्या स्वदेशी प्रकारामुळे, देशातील शेतकरी वर्गाला आयात उत्पादनांपेक्षा कमी खर्चात चांगल्या दर्जाची उत्पादने मिळू शकतील असे मांडवीय यांनी या प्रसंगी सांगितले. ही दोन्ही उत्पादने एफसीओ दर्जाची असून त्यांनी भारत सरकारच्या खत विभागच्या अधिकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र मिळविले आहे असे ते म्हणाले.
आतापर्यंत ही चीन, नॉर्वे आणि इस्रायल यासारख्या देशांकडून आयात केली जात होती, आणि आपण संपूर्णपणे आयात केलेल्या उत्पादनांवरच अवलंबून होतो. जीएसएफसीसारख्या कंपनीने प्रथमच यांचे देशात उत्पादन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, ही खूप उल्लेखनीय बाब आहे असे ते म्हणाले.