Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी हे नक्की वाचा

नांदेड :- जिल्ह्यातील कर्जमुक्तीस पात्र 11 हजार 500 शेतकऱ्याची सातवी यादी 1 जानेवारी 2021 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 9 हजार 176 शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आधार प्रमाणिकरण केले नाही. आधार प्रमाणिकरण केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार नाही. आधार प्रमाणिकरण शिल्लक शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करण्याबाबत व ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन तक्रार निकाली काढून घ्यावी, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. अमोल यादव यांनी केले आहे.
याचप्रमाणे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या भागातील सेतू केद्रावर आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.
थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने “महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2019” ही 27 डिसेंबर 2019 च्या शासननिर्णयाद्वारे कार्यन्वित केली आहे. यात 1 एप्रिल, 2015 ते 31 मार्च, 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुर्नगठन / फेरपुनर्गठन केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर, 2019 रोजी 2 लाखापर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यात या योजनेंतर्गत एकूण 2 लाख 14 हजार 491 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र असुन त्यापैकी बँकांनी 2 लाख 7 हजार 146 शेतकऱ्याची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. या बँकांनी अपलोड केलेल्या माहिती पैकी शासनाने कर्जमाफी पात्र असणाऱ्या 1 लाख 94 हजार 324 शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 1 लाख 85 हजार 148 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण केलेली आहे. आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण केलेल्या शेतकऱ्यांपैकी 1 लाख 79 हजार 628 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम 1229.22 कोटी जमा करण्यात आले आहेत. उर्वरीत आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हास्तरीय समिती व तालुकास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या तालुक्यातील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन तक्रार निकाली काढून घ्यावी, असेही आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. अमोल यादव यांनी केले आहे.
Exit mobile version