Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सेंद्रीय शेतीत अन्नद्रव्य व्यवस्थापन करतांना जिवाणू संख्या व पिक पोषण महत्‍वाचे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने तीस दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन सदरिल प्रशिक्षणाचे चौथे पुष्प दिनांक १८ फेबुवारी रोजी सेंद्रीय शेतीमधील अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल हे होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व  संशोधन परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरीहर कौसडीकर हे होते, मौजे येडेनिपाणी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील प्रगतशील शेतकरी श्री. कृष्णा पाटील, आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्‍या विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल म्‍हणाले की, सेंद्रीय खतामुळे जमिनीतील जिवाणूंची कार्यक्षमता वाढते व त्यामुळे जमिनीतील  अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध होतात. सेंद्रीय निविष्ठा घरीच तयार करुन जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी त्यांचा वापर करावा जेणे करुन जीवंत शेती पुढच्या पिढीस सोपवता येईल.

मार्गदर्शनात प्रमुख वक्ते डॉ. हरीहर कौसडीकर हे म्हणाले की, सेंद्रीय शेतीत पीक लागवड तंत्रज्ञान, पीक संरक्षण व अन्नद्रव्य व्सवस्थापन ही महत्वाची त्रिसुत्री आहे. अधिक उत्पादन देणारे विविध पिकांचे वाण लागवड केल्यामुळे रासायनिक खतांचा, कीटकनाशक व तणनाशकांचा वापर मोठया प्रमाणात झाला असुन जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. पीकांची प्रतिकारक्षमता सातत्याने कमी होत आहे. संतुलीत पीक पोषणासाठी जमीन हा सर्वात महत्वाचा घटक आहे. चांगले व गुणात्मक पिकांचे उत्पादन घ्यावयाचे असेल तर जमिनीला सशक्त करणे आवश्‍यक आहे. सेंद्रीय शेतीतील अन्नद्रव्ये व्यवस्थापनासाठी सेंद्रीय खते, जिवाणू खते, हिरवळीची खते, पिक फेरपालट, भुसुधारकांचा वापर, पिकांचे अवशेष आदींचा वापर करणे आवश्‍यक आहे. कंपोस्ट खत, गांडुळ खत शेतावरच तयार करावेत. सेंद्रीय पदार्थाचे कर्ब व नत्र  गुणोत्तर प्रमाण जास्त असणे आवश्‍यक आहे.

स्‍वत:चा अनुभव सांगतांना प्रगतशील शेतकरी श्री. कृष्णा पाटील म्‍हणाले की, मी माझ्या शेतावर कुठल्याही प्रकारची रासायनिक निविष्ठा न वापरता हळदीचे व आद्रकाचे उत्पादन घेतो. या उत्पादनापासून सेंद्रीय पध्दतीने हळदी पावडर व सुंठ पावडर तयार करतो व त्यापासुन भरपुर नफा मिळवतो.

सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आले आहे. आज प्रशिक्षणात दोन हजार हुन अधिक शेतकरी बंधू भगिनी तसेच विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान  केंद्राचे विषय विशेषज्ञ यांनी सहभाग नोंदविला होता. प्रमुख वक्ते यांनी शेतक-यांनी विचालेल्या प्रश्‍नांचे उत्तरे देऊन त्‍यांचा शकांचे समाधान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ. प्रितम भुतडा यांनी मानले.   डॉ. सुदाम शिराळे यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अनुराधा लाड, डॉ. संतोष  बोरगावकर, डॉ. पपीता गौरखेडे, श्री. अभिजीत कदम, श्री. दिपक शिंदे, श्री. सतीश कटारे, श्री. योगेश थोरवट आदींनी परिश्रम  घेतले.

Exit mobile version