Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशभरात साजरा होतोय सशस्त्र सेना ध्वज दिन, जाणून घ्या माहिती

शाळेत असताना सैन्य ध्वजासाठी निधी जमा करून मिळणारा ध्वज गणवेशावर अभिमानाने मिरवण्याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला असेल. आज ७ डिसेंबर. आज देशात सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जात आहे. सरकारने 1949 पासून सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. ०७ डिसेंबर १९४९ पासून सुरू झालेला हा प्रवास आजतागायत सुरू आहे.

देशातील जनता व इतर सामाजिक संस्था ध्वजनिधी जमा करतात. या निधीचा वापर देशाचे रक्षण करीत असताना धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या, पत्नींच्या व मुलांच्या, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो. जिल्हा सैनिक बोर्ड शाळा, कॉलेज व विविध संस्थांच्या मदतीने निधीची रक्कम गोळा करते. निधी देणारांना लाल, निळा व गडद निळ्या रंगांमध्ये असलेले कागदाचे टोकन फ्लॅग दिले जातात. फ्लॅगचे हे तीन रंग म्हणजे जिल्हा सैनिक बोर्ड, राज्य सैनिक बोर्ड व केंद्रिय सैनिक बोर्ड यांचे प्रतीक आहेत. आपणही जवळच्या शाळेत किंवा सैनिक कल्याण कार्यालयात जाऊन ध्वजनिधी जमा करून देशसेवा करू शकता आणि अभिमानाने देशाचा ध्वज आपल्या छातीवर मिरवू शकता.

अशी आहे पार्श्वभूमी
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ११ नोव्हेंबर हा दिवस स्मरण दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जात असे. त्या दिवसाला पॉपी डे असे सुद्धा म्हणत. स्मरण दिनास निधी देणारास कागदी शोभेची फुलझाडे देण्यात येत असत. त्या काळातील माजी ब्रिटिश सैनिकांबरोबरच भारतीय सैनिकसुद्धा हा निधी वापरू शकत होते. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या संरक्षण मंत्रालयाला ही प्रथा अयोग्य वाटल्याने त्यांनी अशा निधीचे संकलन एका विशिष्ट दिवशी करण्यात यावे व त्याचा विनियोग माजी सैनिक व सेवेतील सैनिकांसाठी व्हावा असा निर्णय जुलै, इ.स. १९४८ मध्ये घेतला. २८ ऑगस्ट, इ.स. १९४९ या दिवशी संरक्षण मंत्रालयाच्या समितीने ७ डिसेंबर या दिवशी ध्वजदिन साजरा केला जाईल असे ठरविले. तेव्हापासून देशात सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जात आहे.

सशस्त्र सेना ध्वज दिन

०७ डिसेंबर १९४९ पासून सुरू झालेला हा प्रवास आजतागायत सुरू आहे. स्वातंत्र्यानंतर लगेचच, सरकारला सैनिकांच्या कुटुंबीयांच्या गरजा पूर्ण करण्याची गरज आहे असे वाटू लागले आणि म्हणून 07 डिसेंबर हा ध्वज दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. यामागील विचार असा होता की लोकांमध्ये छोटे झेंडे वाटून देणगी मिळेल, ज्याचा फायदा शहीद सैनिकांच्या आश्रितांना होईल. सुरुवातीला हा ध्वज दिवस म्हणून साजरा केला जात होता परंतु 1993 पासून तो सशस्त्र सेना ध्वज दिनात बदलण्यात आला.

माझी सेना माझा अभिमान…
हा दिवस साजरा करण्यासाठी, भारतीय सशस्त्र दलाच्या तिन्ही शाखा – भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना (IAF) आणि भारतीय नौदल – विविध प्रकारचे शो, कार्निव्हल, नाटके आणि इतर मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करतात. . रेल्वे स्थानकांवर, शाळांमध्ये किंवा इतर ठिकाणी आज लोक तुम्हाला झेंडे घेऊन जाताना दिसतील ज्यातून तुम्ही झेंडे खरेदी करून या उदात्त कार्यात हातभार लावू शकता.

Exit mobile version