महाराष्ट्रात पशुसंवर्धन आणि जोडधंद्यांमध्ये अर्जेंटिनाच्या तंत्रज्ञानाचे सहकार्य

अर्जेंटिना रिपब्लिकच्या शिष्टमंडळाने घेतली पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांची भेट

मुंबई, दि. 7 : महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी अर्जेंटिनाच्या तंत्रज्ञानाचे सहकार्य घेण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी सागितले.

मंत्रालयात अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाने पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांची भेट घेऊन विविध विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव श्री.गुप्ता, अर्जेंटिनाचे राजदूत हुगो गोबी, मुंबई येथील कौन्सिल जनरल ऑफ अर्जेंटिना यांच्यासह डेप्युटी कौन्सील जनरल सेसीलिया रिसोला यांची उपस्थिती होती.

अर्जेटिनाचे पथक महाराष्ट्रातील पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायाच्या विविध प्रकल्पांना भेट देऊन येथील माहिती घेणार आहेत. तसेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेळी पालन, कुक्कुट पालन, यांच्याविषयीही माहिती घेणार आहेत. ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी अर्जेंटिनाच्या तंत्रज्ञानाचे सहकार्य घेण्यात येणार असल्याचे मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाने अर्जेंटिनातील पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसायातील माहिती दिली. दुग्धव्यवसायमंत्री सुनिल केदार यांनी राज्यातील महानंद सारख्या दुग्ध प्रकल्पांची सविस्तर माहिती देऊन राज्यातील शेळी, कुक्कुटपालन ग्रामीण भागातील जनतेचा आर्थिक कणा मजबूत करण्याचे महत्त्वाचे साधन असल्याचे सांगून हा व्यवसाय अधिक अधिक विकसित करण्यासाठी नव नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.