२०२१ वर्ष जागतिक तापमान वाढीचा उच्चांक मोडण्याचे संकेत
२०१५ ते २०२० हे वर्ष अत्याधिक उष्ण लहरींचे वर्ष ठरले आहे. त्याप्रमाणेच २०२१ हे वर्ष सुद्धा अती तापमानाचे व उष्ण लहरींचे वर्ष ठरणार आहे.२०२१ वर्ष जागतिक तापमान वाढीचा उच्चांक मोडणार असल्याचे संकेत आहे.दरम्यान जागतिक हवामान जोखीम निर्देशांक २०२१ नुसार भारत हा धोक्याच्या सातव्या क्रमांकावर आहे. जंगलतोड, शहरीकरण आणि प्रदूषण या घटकामुळे भविष्यात पुन्हा तापमान वाढ आणि उष्ण लहरींचा धोका निर्माण होणार असल्याची भीती पर्यावरण आणि हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली आहे
मार्च महिन्याच्या शेवटी हवामान विभागाने उन्हाळ्यात वाढणाऱ्या उष्ण लहरीचा इशारा दिला होता. २ मार्च २०२१ रोजी भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार येत्या उन्हाळ्यात मध्यभारत, उत्तर, पूर्व भारतात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. मार्च ते मे महिन्यात ओडिशा, झारखंड येथे दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सिअस अधिक किंवा अत्याधिक असेल. मार्च ते मे २०२१ मध्ये दिल्ली, चंदीगड, उत्तर प्रदेश, हरियाणा येथे दिवसाचे व रात्रीचे तापमान व उष्ण लहरींचे प्रमाण वाढणार असल्याने तेथील लोकांनी सावध असले पाहिजे असे म्हटले आहे. यासोबतच हिमाचल प्रदेश, कच्छ, राजस्थान उत्तराखंड,मेघालय, अरुणाचल, सिक्कीम, मिझोराम, मणिपूर, बिहार या प्रदेशात देखील तापमान वाढलेले असेल. दक्षिण भारतात तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, विदर्भ आणि महाराष्ट्रातील काही प्रदेशात तापमान ०.५ अंश सेल्सियस अधिक राहील.