राज्यात दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता

जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायाम शाळा प्रतिनिंधीशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा

सामूहिक व्यायाम प्रकार झुंम्बा, स्टिम, सौना बाथ बंद राहणार

मुंबई, दि. 17 :- कोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी आज जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेत ते बोलत होते.  जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा याठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्याची ग्वाही या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिली. पण स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुंम्बा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार ‘एसओपी’तील निर्देशानुसार पूर्णपणे बंद राहणार असल्याचेही सांगण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, जिम, व्यायामशाळा या आरोग्यासाठीच आहेत. पण त्यामुळे आरोग्याचे प्रश्न वाढू नयेत याची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे मोठ्या शहरांबरोबच राज्यातील ग्रामीण भागातही जिम, व्यायामशाळा यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना तयार करण्यात आलेली ‘एसओपी’चे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. हा व्यवसाय आहे, पण तसा तो जनतेच्या आरोग्याशी निगडीत आहे, याची काळजी घेणे आवश्यक आहे. आता रुग्ण संख्या कमी होते आहे. पण युरोप खंडातील उदाहरणांवरून आपल्याला सावधही रहावे लागेल. आपण अनेक निर्बंध शिथिल करत आहोत. पण यातून हळू-हळू गाफीलपणा वाढू नये यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

या ‘एसओपी’चे पालन करण्याची जबाबदारी जिम, व्यायामशाळा यांच्या मालकांवर आहे. या ‘एसओपी’चे काटेकोर पालन न केल्यास, गलथानपणा आढळल्यास मात्र संबंधितावर कठोर कारवाई करणे भाग पडेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

 एसओपीनुसारच दसऱ्यापासून जिमफिटनेस सेंटर्सव्यायामशाळा चालणार

आरोग्य विभाग, वैद्यकीय तज्ज्ञ आणि जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायामशाळांचे चालक यांनी तयार केलेल्या ‘एसओपी’चे पालन करूनच दसऱ्यापासून जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा सुरू करता येणार आहेत. हे नियम तपशीलाने आणि नेमकेपणाने तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये व्यायामासाठी येणाऱ्या सदस्यांना या ‘एसओपी’ची पूर्णपणे माहिती देणे अपेक्षित आहे. व्यायाम शाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे. प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी तसेच स्वच्छतेच्या बाबी यासाठी तपशीलाने नियमावली तयार करण्यात आली आहे. व्यायामशाळेत प्रवेश करण्यापासून ते व्यायाम करताना कोण-कोणती काळजी घ्यावे याचे नियम आहेत. शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे या नियमित गोष्टी बरोबरच, क्षेत्रफळांनुसार जास्तीत जास्त सुरक्षित शारीरिक अंतर राखणे. व्यायामशाळेचे दर तासाला निर्जंतुकीकरण करणे. उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, वापरानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करणे. दररोज रात्री जिम,व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे.