शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी असा करा अर्ज

नांदेड  :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्न-धान्य पिके व गळीतधान्य 2021-22 अंतर्गत रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्याक्षिके, सुधारीत कृषी औजारे व सिंचन सुविधा साधणे या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रणालीद्वारे 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत अर्ज महाडीबीटी पोर्टलवर करावेत. पीक प्रात्याक्षिके शेतकरी गटामार्फत राबविले जाणार आहेत. यासाठी कृषी सहायकांशी संपर्क साधून 10 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके व गळती धान्य कार्यक्रम जिल्ह्यात पुढीलप्रमाणे राबविला जातो. यात कडधान्य (हरभरा), पोष्टीक तृणधान्य (ज्वारी), गळीतधान्य (करडई) निर्देशीत आहे. बियाणे वितरणामध्ये हरभरा बियाणासाठी दहा वर्षाआतील वाणास रुपये 25 प्रती किलो, दहा वर्षावरील वाणास 12 रुपये प्रती किलो, रब्बी ज्वारी बियाणांसाठी 10 वर्षातील वाणास 30 रुपये प्रती किलो, दहा वर्षावरील वाणास 15 रुपये प्रती किलो, करडई बियाणासाठी 40 रुपये प्रती किलो असे एकुण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादत लाभ देय आहे.
पिक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. बियाणे जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भू सुधारके, व पीक संरक्षक औषधे या निविष्ठासाठी एकर मर्यादेत डीबीटी तत्वावर अनुदान अदा करण्यात येईल. एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी पिकाच्या प्रकारानुसार 2 हजार ते 4 हजार प्रती एकर मर्यादेत डीबीटी तत्वावर अनुदान दिले जाईल. यासाठी कृषि विद्यापिठातील शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन व लॉटरी पद्धतीने होणार असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी आर.बी.चलवदे यांनी स्पष्ट केले.