Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

जनावरांना चारा पुरवण्याचे कारखान्यांना आवाहन

“सर्वजण मिळून भीषण पूरपरिस्थितीवर मात करुया” – पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला पूरग्रस्तांना धीर

“पूरपरिस्थितीला सामोरं जाणं हे एकट्या- दुकट्याचं काम नाही, आपण सर्वजण मिळून या भीषण संकटावर मात करुया!”, अशा शब्दात कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील स्थलांतरित पूरग्रस्तांना धीर दिला.

शिरोळ तालुक्यातील पुरग्रस्त व जनावरांचे प्रशासनाच्या वतीने गुरुदत्त साखर कारखान्याच्या छावणीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. या छावणीला आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट देवून पूरग्रस्तांशी संवाद साधला तसेच त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

यावेळी कारखान्याचे संचालक बबन चौगुले, संजय गायकवाड, विकास चौगले, पंचायत समिती सभापती दीपाली परीट, सैनिक टाकळीच्या सरपंच हर्षदा पाटील, नवे दानवाड च्या सरपंच वंदना कांबळे यांच्यासह पदाधिकारी, सरपंच, सैनिक टाकळीच्या स्वराज्य करिअर अकॅडमीच्या वतीने मदतकार्य करणारे विनोद पाटील, मंडल अधिकारी विनायक माने, आरोग्य अधिकारी, स्थलांतरित पूरग्रस्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

छावण्यांमध्ये स्थलांतरित पूरग्रस्तांसाठी नास्ता व जेवणाची व्यवस्था करण्यासाठी एसडीआरएफ (राज्य आपत्ती निवारण निधी) मधून निधीची तरतूद व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी पालकमंत्री सतेज पाटील यांनी याबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली.

पूरग्रस्तांसाठी छावणी उभारुन त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केल्याबद्दल गुरुदत्त शुगर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्या कामाचे कौतुक करुन पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, गुरुदत्त कारखान्याप्रमाणेच अन्य कारखान्यांनी देखील जनावरांना चारा पुरवण्यासाठी दत्त, जवाहर, शरद साखर कारखान्यांचे चेअरमन यांनाही विनंती करु. या भागातील पूरपरिस्थिती, मदतकार्य पोहोचवणे, आरोग्य सेवा सुविधा याबाबतआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्याशी चर्चा करुन गतीने कार्यवाही सुरु आहे, असे सांगून ते म्हणाले, या महिन्या अखेर पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा पूरपरिस्थिती उदभवू शकते, यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत नागरिकांनी छावणीत रहावे तसेच जनावरांनाही चारा छावण्यांमध्ये ठेवावे, असे आवाहन करुन आपल्या राहण्याची, जेवणाची आणि आपल्या जनावरांच्या चारा-पाण्याची सोय केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले. या छावणीतील जनावरांना गोकुळ दूध उत्पादक संघाच्या वतीने पशुखाद्य पुरवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पूरग्रस्तांना वेळेत चहा, नास्ता, जेवण मिळतेय का, आरोग्य सुविधा दिली जातेय का, जनावरांना चारा दिला जातोय का, पशू वैद्यकीय सेवा दिली जातेय का? आदी विविध बाबींवर पुरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा पालकमंत्री श्री.पाटील यांनी जाणून घेतल्या. शासन आपल्या सोबत असून सध्या मदतकार्यावर भर आहे. पूर ओसरल्यावर  झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन मदत दिली जाईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

दरम्यान घोसरवाड, दत्तवाड, टाकळीवाडी, सैनिक टाकळी, अकिवाट या भागातील पूरपरिस्थितीची पाहणी तसेच कन्या शाळा व काखान्यावरील चारा छावणीला भेट देऊन पाहणी केली. तसेच झालेल्या नुकसानीबाबत ग्रामस्थांशी चर्चा करुन ‘घाबरु नका, शासन व प्रशासन तुमच्या सोबत आहे,’ असे सांगितले.

मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे  शेती आणि घरांमध्ये पुराचे पाणी येतेय, याबद्दल हतबलता व्यक्त करुन प्रशासनाने वेळेत पूरपरिस्थितीची माहिती दिल्यामुळे तात्काळ स्थलांतरित होता आले. तसेच जीवित व वित्तहानी टाळता आली, याबद्दल पूरग्रस्त स्थलांतरितांनी प्रशासकीय यंत्रणेला धन्यवाद दिले. याबरोबरच कारखाना छावणीत नाश्ता, जेवणाची चांगली सोय केल्याचेही आवर्जून सांगितले.

गुरुदत्त शुगर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यस्थळावर १५०० पूरग्रस्त व त्यांच्या ८०० जनावरांची नेटकी व्यवस्था गुरुदत्त कारखान्याने केली आहे. पूरग्रस्तांना दोन वेळचा नास्ता, जेवण तसेच सर्व जनावरांना चारा देण्याची व्यवस्था केली आहे. २००५ व २०१९ मधील महापुरात देखील कारखान्याने छावणी उभारुन मदत केल्याची माहिती यावेळी कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी विकास चौगले यांनी दिली.

Exit mobile version