राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने ‘महाव्होटर चॅटबॉट’द्वारे मतदार नोंदणीची सुविधा आणि त्यासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे आता एका क्लिकवर उपलब्ध करून दिली आहेत. त्याचा प्रारंभ राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्या हस्ते आज झाला.
राज्य निवडणूक आयोगाने 2017 मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी जगात पहिल्यांदा निवडणूक प्रक्रियेत ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यात प्रत्यक्ष मतदानाबाबतच्या सर्व माहितीचा समावेश होता. भारत निवडणूक आयोगातर्फे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत राबविण्यात येत असलेल्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने आता मतदार नोंदणीसंदर्भातील सर्व प्रकारची माहिती आणि प्रश्नांची उत्तरे मिळतील.
महाव्होटर चॅटबॉटच्या http://bit.ly/mahavoter या दुव्यावर (लिंक) क्लिक केल्यास मराठी आणि इंग्रजी भाषेचा पर्याय उपलब्ध होईल. त्यानंतर आपल्या मनातील सर्व शंकांचे निरसन वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या माध्यमातून (एफएक्यू) सहज आणि सुलभरीत्या होईल. मतदार यादीतील आपल्या नावाचा शोध घेणे, मतदार यादीत नाव नोंदविणे, त्यासाठीचे आवश्यक कागदपत्रे, तांत्रिक स्वरूपाची माहिती, नावात किंवा पत्त्यात दुरुस्ती करणे, नाव वगळणे आदींसंदर्भातील एफएक्यूंचा त्यात समावेश आहे.
यादीतील आपल्या नावाचा शोध घेण्यासाठी, नव्याने नाव नोंदविण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी थेट लिंक उपलब्ध होईल. त्याद्वारे तिथल्या तिथे आपण अपेक्षित कार्यवाही करू शकतो. याशिवाय आपण +917669300321 या व्हॉट्सॲप क्रमांकावर Hi करून माहिती मिळवू शकतो किंवा https://mahavoter.in या संकेतस्थळालाही भेट देऊ शकता.
मतदार म्हणून आता विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यात नाव नोंदविल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांत मतदान करता येईल. महाव्होटर चॅटबॉटने तर मतदार नोंदणीचे काम अधिक सुलभ झाले आहे. तरुणांना ते नक्कीच आवडेल. त्यामुळे मतदारांनी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. मदान यांनी केले आहे.