Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषिदिन : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंतीनिमित्त अभिवादन

महाराष्ट्राला अन्न-धान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार स्व.वसंतराव नाईक यांनी तडीस नेला. हाडाचे शेतकरी आणि कृषीतज्ज्ञ असलेल्या नाईक यांनी आपल्या अनुभवाचा शेती आणि सिंचन क्षेत्राच्या विकासासाठी उपयोग केला.  शेतकरी स्वावलंबी व्हावा असा त्यांचा ध्यास होता. शेतीतील आव्हानांवर मात करण्याची, आधुनिकीकरण स्वीकारण्याची प्रेरणा स्व. नाईक यांनी दिली.

स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी, अथक कष्टातून, दूरदृष्टीच्या निर्णयातून राज्यात कृषीक्रांती घडवली. १९७२ च्या दुष्काळाच्या कठीण काळात राज्याचं नेतृत्वं केलं. त्यावेळची आव्हानं, आजच्या तुलनेत खूपच कठीण असूनही नाईक साहेब डगमगले नाहीत. आव्हानांना धीराने सामोरे गेले. त्यांनी संकटात संधी शोधली. संधीचं सोनं केलं.  गरीबांच्या हातांना काम देण्यासाठी रोजगार हमीची योजना आणली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणं उपलब्ध केली. जलसंधारणाची कामं वाढवली. शेतीला शाश्वत विकासाचा मार्ग दाखवला. राज्यात कृषीक्रांती यशस्वीपणे घडवली.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित-धवल क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज गुरुवार, दि. 1 जुलै रोजी अभिवादन करण्यात आले.

विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सदस्य हरिसिंग राठोड व महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी पुष्पहार अर्पण करण्यात आला.

स्व.नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या कृषी दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित कृषी मंत्री दादाजी भुसे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनीही स्व.नाईक यांना अभिवादन केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री, राज्यातील कृषीक्रांतीचे जनक, स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांची आज जयंती. त्यांच्या स्मृतींना, कार्याला, विचारांना भावपूर्ण अभिवादन, अशा शब्दात स्वर्गीय वसंतराव नाईक जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे.

Exit mobile version