Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

राज्यात ‘नर्सरी हब’ सुरु करण्यासंदर्भात कृषी विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावा

मुंबई,  : राज्यात एकाच ठिकाणी फुले, फळे व भाजीपाला तसेच रोपे, कलमे विक्री सुविधा केंद्र (नर्सरी हब) असणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या रोपवाटिकाधारकांसाठी त्यांच्याकडील फळे, भाजीपाला, फुले, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती इ. पिकांच्या कलमे-रोपे विक्रीसाठी एकत्रित सुविधा निर्माण व्हावी यासाठी राज्यात ‘नर्सरी हब’ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून कृषी विद्यापीठांनी यासंदर्भात प्रस्ताव सादर करावे, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

मंत्रालयात राज्यात नर्सरी हब सुरु करण्यासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, कृषी आयुक्त धीरज कुमार, रोपवाटिका उत्पादक शेतकरी प्रतिनिधी, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील विभागानुसार पीक पद्धतीचा अभ्यास करुन कृषी विद्यापीठांनी प्रायोगिक तत्वावर नर्सरी हब सुरु करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना देऊन यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करावा, असे निर्देश श्री.भुसे यांनी दिले.

कृषीमंत्री श्री.भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना फळे, भाजीपाला, फुले, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती इ. फलोत्पादन पिकांच्या विविध वाणांची कलमे-रोपे एका ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन निवड करता येईल. तसेच विशिष्ट वाणाच्या खरेदी-विक्रीतील किंमतीचा फरक कमी होऊन अवास्तव नफेखोरीला आळा बसून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. यामुळे लघुउद्योगास चालना, रोजगार निर्मितीमध्ये वाढ, शोभीवंत फुले-फळे निर्यात वाढून देशाच्या परकीय चलनवाढीस मदत होईल, असेही श्री.भुसे यांनी सांगितले.

Exit mobile version