Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

बारामतीत ९ ते १३ फेब्रुवारी रोजी कृषी तंत्रज्ञान सप्ताह..!

कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दरवर्षी कृषिक प्रदर्शन आयोजित केले जाते. यावर्षी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान कृषिक- कृषी तंत्रज्ञान सप्ताह आयोजित केला जाणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कृषिमंत्री दादाजी भुसे, उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे या सप्ताहा दरम्यान भेट देणार असल्याची माहिती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.

देशभरात सुरू असलेल्या शेती विषयक अनेक समस्यावर शेतकऱ्यांना पर्याय देण्याचा प्रयत्न या सप्ताहामध्ये केला जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अनेक नवीन तंत्रज्ञानाची पाहणी करता येईल. देशभरात सध्या सुरू असलेल्या शेती आणि शेतीपूरक व्यवसायासंदर्भातील त्रिसूत्रीचा अवलंब करण्याच्या दृष्टीने यापुढील काळात पर्यावरणाचा समतोल साधून शेतीमध्ये उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागणार आहे. त्यादृष्टीने राज्यातील पर्यावरण, उच्चशिक्षण आणि शेती या खात्याशी निगडित मंत्रीमहोदय या प्रदर्शनाची पाहणी करणार आहेत. ज्या माध्यमातून राज्याच्या नव्या कृषी धोरणाचा पर्याय आखता येण्यास मदत होणार आहे.

या वर्षी कृषिक-कृषि तंत्रज्ञान सप्ताह २०२२ या सप्ताहामध्ये शेतकऱ्यांना होमिओपॅथीचा कृषी क्षेत्रात प्रभावी वापर करून उत्तम प्रकारची शेती करता येते याचे जिवंत प्रात्यक्षिक पाहता येईल. एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट पद्धत वापरून वासरांची निर्मिती व पशुरोग निदान सुविधा या सप्ताहात पाहता येईल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या तंत्रज्ञान सप्ताहात कृषी क्षेत्रातील अद्ययावत व नावीन्यपूर्ण गोष्टी पाहता येतील.Agri-Innovations, Start-ups / PMFME विकेल ते पिकेल, एक जिल्हा एक पीक अशी यापूर्वी न पाहिलेली अनेक शेती व शेतीपूरक व्यवसायाची प्रयोगांची पाहणी येथे करता येणार आहे.

जर्मनी, चीन, नेदरलांड थायलंड जपान देशांमध्ये वापरले जाणारे खत व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान देखील पाहता येईल. त्याचबरोबर अत्यंत कमी खतामध्ये अधिकाधिक उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग देखिल पाहता येणार आहे. याखेरीज सेन्सर तंत्रज्ञान, ड्रोनद्वारे फवारणी तंत्रज्ञान आणि रोबॉटीक्स, अत्याधुनिक मशिनरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.

जपान, कोरिया, नेदरलंड, थायलंड, अमेरिका आदी देशांतील भाजीपाला, पिकांचे जिवंत प्रात्यक्षिक पाहता येईल. आरोग्यदायी भरडधान्य, फुलांच्या विविध जाती व लागवड तंत्रज्ञान, मधुमक्षिका पालन, जैविक खते, PROM उत्पादन व इतर बरेच काही या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.
हे नॅनो तंत्रज्ञान राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version