Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

महिला शेतमालाला जागतिक बाजारपेठेसाठी दुबईला करार

महिला आर्थिक विकास महामंडळ आपल्या ई-बिझनेस प्लॅटफॉर्मद्वारे महिला सक्षमीकरणासाठी काम करत असून त्यासाठी बाजारपेठेतील संबंध विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या अनुषंगाने, वर्ल्ड एक्स्पो, दुबई येथे ‘माविम’ने एलबीआय जनरल ट्रेडिंग एलएलसी, बीबी ग्लोबल एफझेडई आणि सॅन बॅन बिझनेस कमर्शियल इन्व्हेस्टमेंट एलएलसी सोबत तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिली.

महिला आर्थिक विकास महामंडळने स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी बचतगटासारख्या माध्यमांचा उपयोग केला आहे. ‘मविम’ही राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी त्यांना सक्षम करणारी, महत्त्वाची यंत्रणा आहे. बचतगटाच्या महिलांच्या शेतमालाला बाजारपेठ व उत्कृष्ट दर मिळवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे.

महिला व बाल विकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, या सामंजस्य कराराद्वारे, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील महिला शेतकऱ्यांकडून कृषी मालाच्या खरेदीवर लक्ष केंद्रित केले जाईल. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील महिला शेतकऱ्यांकडून सुमारे 42,000 टन कृषी माल खरेदी होईल.या भागीदारीमुळे कांदा, तांदूळ, ताजी फळे आणि भाजीपाला या उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध होईल. या सामंजस्य करारामुळे महिला शेतकऱ्यांसाठी जागतिक बाजारपेठेत आपला कृषी माल पोहोचण्यासाठी संधी मिळणार आहे. या तीन सामंजस्य करारांचे मूल्य जवळपास 60 ते 65 कोटी  असण्याची अपेक्षा आहे, ज्याचा राज्यभरातील ५० हजार महिला शेतकऱ्यांना फायदा होईल.

ग्रामीण महिलांचे संघटन, त्यांची क्षमता बांधणी, उद्योजकता विकास यासाठी ‘माविम’कडून काम केले जाते. या सामंजस्य करारामुळे बचतगटाच्या महिलांच्या शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळाली याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया ‘माविम’च्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, यांनी  या सामंजस्य कराराबाबत व्यक्त केली. ‘माविम’च्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यावेळी उपस्थित होत्या.

‘माविम’ संचलित बचतगटांचे महासंघ देशपातळीवर अव्वल

नाबार्ड आणि महिला अभिवृध्दी सोसायटी, आंध्रप्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील बचत गटांच्या महासंघांसाठी झालेल्या सर्वंकष मूल्यमापनात महाराष्ट्रातील महिला विकासाची शिखरसंस्था असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ, (माविम) संचालित बचतगटांच्या महासंघाने अव्वल स्थान पटकावले आहे.

नाबार्डचे अध्यक्ष श्री.जी आर चिन्ताला आणि मुख्य महाव्यवस्थापक श्रीमती विजयालक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत हैद्राबाद येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत ‘माविम’च्या ठाणे जिल्ह्यातील क्रांतीज्योती सीएमआरसी आनगावला एक लाख रू.रकमेच्या रोख पारितोषिकासह देशभरातून प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले. तर विभाग पातळीवर ‘माविम’च्या उत्कर्ष सीएमआरसी गोंदिया आणि तेजस्विनी सीएमआरसी भंडारा यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावत ‘माविम’च्या सातत्यपूर्ण यशात उल्लेखनिय भर टाकली. या पुरस्‍काराची रक्‍कम प्रत्येकी रु. २०,०००/- आहे. भारतातील पात्र 120 हून अधिक SHG महासंघांपैकी 13 महासंघांची निवड करण्यात आली.

यावेळी ”व्हीजन 2030” अंतर्गत भारतातील बचत गट व बचतगटांच्या महासंघांचे पुनरूज्जीवन या विषयावर झालेल्या परिसंवादात ‘माविम’च्या महाव्यवस्थापक श्रीमती कुसूम बाळसराफ यांनी माविमसह महासंघांची भविष्यकालीन उपयुक्तता यावरही प्रकाश टाकला.

या कार्यक्रमासाठी व पुरस्कार स्विकारण्यासाठी क्रांतीज्‍योती लोकसंचलित साधनकेंद्र, आनगावचे अध्‍यक्ष सौ शुभांगी शशिकांत जाधव, सौ अंजली कमलाकर ठाकरे – खजिनदार, श्रीमती – अरुणा विजय गायकवाड – व्यवस्थापक, गोंदिया जिल्‍ह्यातील उत्‍कर्ष लोकसंचलित साधन केंद्राचे श्रीमती मोनीता राणे, व्यवस्थापक व श्रीमती तुलसी चौधरी अध्यक्षा व भंडारा जिल्‍ह्यातील तेजस्विनी लोकसं‍चलित साधनकेंद्राचे श्रीमती भारती झंझाड – अध्यक्षा, श्रीमती वनमाला बावनकुळे – व्यवस्थापक  हे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्रीमती कुसुम बाळसराफ, महाव्‍यवस्‍थापक (प्रकल्‍प), माविम यांनी पॅनलिस्ट म्हणून सहभाग घेतला. श्रीमती शितल लाड, विकास अधिकारी व  श्रीमती अस्मिता मोहिते, जिल्‍हा समन्‍वय अधिकारी, ठाणे ह्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

देशपातळीवरील ‘माविम’च्या या अभूतपूर्व यशाबद्दल ‘माविम’ अध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकरे यांच्यासह माविम टीमवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version