रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या पाठपुराव्याने जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पैठण व औरंगाबाद तालुक्यातील १७८ गावे या ग्रीड पाणीपुरवठा योजनेच्या ३०७.०६५ कोटी इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
मंत्रालयात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पैठण व औरंगाबाद तालुक्यातील १७८ गावे या ग्रीड पाणीपुरवठा योजनेविषयी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार अंबादास दानवे, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास भुमरे उपस्थित होते.
रोहयो मंत्री संदिपान भुमरे म्हणाले, वॉटर ग्रीड पाणी पुरवठा योजनेच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. पैठण आणि औरंगाबाद तालुक्यातील १७८ गावातील लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. ही योजना तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचना दिल्या असल्याने लवकरात लवकर योजना पूर्ण होऊन लोकांना पाणी मिळणार आहे.
पैठण तालुक्यातील १७८ गावांतील ५५ लिटर दरडोई दरदिवशी क्षमतेच्या रु. ६ हजार २७२ इतका दरडोई खर्च व सुट धरून दरडोई खर्च रू. १ हजार ६६५ असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या रु. ३०७.०६५ कोटी इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अटी व शर्तीची पूर्तता करण्याच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.