सणासुदीसाठी रेल्वेच्या सुमारे 668 विशेष फेऱ्या

देशभरातील प्रमुख ठिकाणे रेल्वेमार्गे जोडण्यासाठी विशेष गाड्यांची योजना आखण्यात आली आहे

सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात, मूळ गावी कुटुंबियांसोबत सण साजरे करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने विशेष  व्यवस्था केली आहे.

या सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, भारतीय रेल्वे यावर्षी दुर्गापूजेपासून छठपूजेपर्यंत 110 विशेष गाड्यांच्या 668 फेऱ्या चालवत आहे. तसेच, या सणासुदीच्या गर्दीत बर्थची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी नियमित गाड्यांच्या  डब्यांमध्ये वाढ करण्यात येत आहे.

देशभरातील प्रमुख ठिकाणांना रेल्वेने जोडण्यासाठी विशेष गाड्यांची योजना आखण्यात आली आहे.

Puja Dipawali Chhatha Specials- 2021 (as on 26.10.21)

Train Notified

Railway No. of Trains Trips
NR 26 312
NCR 4 26
NER 4 24
NWR 4 4
ER 6 44
ECR 6 12
ECoR 8 24
SR 6 12
SER 8 46
SWR 2 10
CR 6 26
WR 18 102
WCR 12 26
Total 110 668

आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत टर्मिनस स्थानकांवर रांगा लावून गर्दीचे नियंत्रण करून  अनारक्षित डब्यांमध्ये प्रवाशांना व्यवस्थितपणे चढता येईल याकडे लक्ष दिले जात आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रमुख स्थानकांवर रेल्वे पोलीस दलाचे अतिरिक्त  जवान तैनात करण्यात आले आहेत. गाड्या सुरळीत चालाव्यात यासाठी प्रमुख स्थानकांवर आपत्कालीन कर्तव्य बजावण्यासाठी अधिकारी तैनात केले आहेत.  रेल्वे सेवेत कुठलाही अडथळा निर्माण झाल्यास  प्राधान्याने तो दूर करण्यासाठी विविध विभागांमध्ये कर्मचारी तैनात केले आहेत.

प्लॅटफॉर्म क्रमांकासह गाड्यांच्या आगमन/निर्गमनाबाबत वारंवार आणि वेळेवर घोषणा करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या स्थानकांवर मदत कक्ष उभारण्यात आले असून  प्रवाशांच्या योग्य मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी आरपीएफ कर्मचारी आणि तिकीट तपासनीस   नियुक्त करण्यात आले आहेत.  प्रमुख स्थानकांवर दूरध्वनी कॉलवर वैद्यकीय पथके उपलब्ध आहेत. निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक असलेली रुग्णवाहिकाही उपलब्ध आहे.

सीट बळकावणे, अतिरिक्त शुल्क आकारणे,दलालांकडून चुकीची माहिती यांसारख्या गैरप्रकारांवर सुरक्षा आणि दक्षता विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून लक्ष ठेवले जात आहे. प्रतिक्षारूम, रिटायरिंग रूम, प्रवासी सुविधा क्षेत्र आणि विशेषत: स्थानकांवर स्वच्छता राखण्याबाबत सूचना विभागीय मुख्यालयाकडून दिल्या जात आहेत.