शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लवकरच एक सर्वमान्य तोडगा निघेल

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने घेतलेल्या प्रयत्नांचे नायडू यांच्याकडून कौतुक

आंदोलक शेतकरी आणि सरकार दोघेही परस्पर संवादासाठी उत्सुक आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत लवकरच एक सर्वमान्य तोडगा काढला जाईल, अशी आशा उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांनी व्यक्त केली.

हैदराबादच्या मुचीन्ताल येथील स्वर्ण भारत ट्रस्ट येथे ‘रायथू नेस्थम’ आणि ‘मुप्पवरप्पू’ यांनी संयुक्तपणे दिलेल्या पुरस्कारांचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते वितरण झाले, त्यावेळी ते बोलत होते. आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींचा त्यावरील प्रतिसाद, याविषयीच्या बातम्यांमधून लवकरच सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आपल्याला दिसते आहे, असे ते पुढे म्हणाले.

दोन्ही बाजूंनी एकमेकांची परिस्थिती समजून घेत बैठकीचे नेमके मुद्दे काढले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दोन्ही बाजूंमध्ये फलदायी आणि अर्थपूर्ण संवाद होईल, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

कृषीमालाच्या विक्रीवर कोणतीही बंधने नसावीत, ही अत्यंत जुनी मागणी असून त्यांनी स्वतःही अनेकदा प्रस्ताव तयार केला होता, असे उपराष्ट्रपती म्हणाले. ‘एक देश- एक अन्नधान्य विक्री केंद्र’ ही जुनी मागणी आहे, असे त्यांनी सांगितले.

देशाचा विकास शेतकऱ्यांच्या विकासावर अवलंबून असल्याचे नमूद करत, शेतकऱ्यांना पाठींबा देणे सर्वांचेच कर्तव्य आहे. अगदी कोविड काळातही अत्यंत कठीण परिश्रम करत देशात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन केल्याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले. त्यासोबतच, डॉक्टर्स, सफाई कामगार, पोलीस आणि प्रसारमाध्यमांनी देखील केलेल्या कामांचे त्यांनी कौतुक केले.

शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी ‘टीम इंडिया’ म्हणून काम करायला हवे, असे नायडू म्हणाले. शेतकऱ्यांच्या मालाला वाजवी किंमत मिळण्याबरोबरच, त्यांना योग्य वेळी, परवडणाऱ्या दरात कर्जपुरवठाही व्हायला हवा. देशात सगळीकडे शीतगृहे आणि गोदामांची संख्या वाढवणे गरजेचे आहे, किंबहुना देशातल्या प्रत्येक तालुक्यात, शीतगृह व्यवस्था हवी, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

भारतीय जनतेने शेतील नेहमीच उच्च दर्जा दिला आहे असे सांगत, देशातल्या सर्व सण आणि उत्सवांचा शेतीशी जवळून संबंध असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

येत्या काळात जगात अन्नधान्याची समस्या निर्माण होऊ शकेल, या एफओ च्या इशाऱ्याबाबत बोलतांना ते म्हणाले की आपण शेतकऱ्यांना साथ दिल्यास, देशात केवळ अन्नसुरक्षा असणार नाही, तर भारत जगालाही अन्नधान्य पुरवू शकेल.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने केलेल्या विविध योजनांचे त्यांनी कौतुक केले. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे या उद्देशाकडे मोदी सरकारची स्थिर वाटचाल सुरु आहे, असे सांगत त्यांनी सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख केला.

कृषी क्षेत्राचा विकास होण्यासाठी लोकांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत, त्यांनी देशातील युवकांना कृषीव्यवसायात सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रो. सर्वरेड्डी वेन्कुरेड्डी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याशिवायविविध क्षेत्रातल्या मान्यवरांना देखील विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

रायथू नेस्थम चे संस्थापक वाय वेंकटेश्वरा राव यांनी कृषी आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचे उपराष्ट्रपतींनी कौतुक केले.

या कार्यक्रमाआधी उपराष्ट्रपतींनी स्वर्ण भारत ट्रस्ट मधील युवकांशी संवाद साधला.