राज्यात सुमारे ८१ लाख नागरिकांचे लसीकरण झाले नसल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे केवळ दहा जिल्ह्यांमध्ये लसीकरण न झालेल्यांची संख्या तब्बल ७२ टक्के आहे.
राज्यात १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले सुमारे ९.१४ कोटी नागरिक लसीकरणाला पात्र आहेत. या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ९ टक्के नागरिकांना लसीचा एकही डोस घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ८ कोटी ३३ लाख १३ हजार १४४ इतकी आहे. तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ६ कोटी २१ लाख ६० हजार ३९१ इतकी आहे. दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या ही २ कोटी ९२ लाख ७४ हजार ६०९ इतकी आहे.
लस न घेतलेल्यांची सर्वाधिक संख्या ठाणे जिल्ह्यात असून त्यानंतर नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. त्यानंतर नांदेड, नगर, औरंगाबाद, बीड, सोलापूर, यवतमाळ, आणि बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. लस न घेण्याच्या कारणांमध्ये अमसर्थता, स्थलांतर व आता महासाथ संपली अशी मानसिकता हे असल्याचे येथील जिल्हा प्रशासनातील अधिका-यांचे म्हणणे आहे.
लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी संबंधित प्रशासनाने स्थानिक अधिका-यांना शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोचण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व प्रयत्न वाढविणे, घरापर्यंत लसीची गाडी नेणे, पूर्ण रात्र लसीकरण राबविणे आणि सामाजिक नेत्यांसोबत चर्चा करणे असे उपाय करण्याचे सांगण्यात आले आहे. बहुतांश जिल्हाधिका-यांनी लस घेण्यात असमर्थता हेच मुख्य कारण असल्याचे सांगितले. ठाणे जिल्ह्यातील आदिवासांनी लस घेणार नाही असा पवित्रा घेतला असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. तसेच मुंबईत काम करणारे अनेक नागरिक ठाणे जिल्ह्यातील आहेत. त्यांनी मुंबईत लस घेतल्याने तेथील आकडे वाढले आहेत. हे आकडे ठाणे जिल्ह्यात दिसणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.
तर जळगाव जिल्ह्यातील सुमारे ७.५ टक्के नागिरकांनी इतर जिल्ह्यांमध्ये लस घेतल्याचे तेथील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. तर बुलडाणा जिल्ह्यात केवळ ८ टक्के नागरिक लसीपासून वंचित असल्याचे जिल्हाधिकारी एस. राममुर्ती यांनी सांगितले.