Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

महिलादिन विशेष : कोव्हिड काळातली संवेदनशील शिक्षिका

शिक्षकांच्या कृतीतून विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार हे पारंपरिक शिक्षणापेक्षा अधिक प्रभावी आणि खोलवर परिणाम करणारे असतात. संस्काराचा हा धागा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न नंदुरबार तालुक्यात लोय येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका रोहिणी पाटील करीत आहेत. कोविड काळात त्यांनी विविध समाजाभिमुख उपक्रम राबवून आपल्यातल्या  संवेदनशील शिक्षिकेचे दर्शन घडविले.

रोहिणी मूळच्या धुळे जिल्ह्यातील आहेत. गेल्या 3 वर्षापासून त्या लोय येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अध्यापनाचे काम करतात. यापूर्वी शहादा येथे त्यांनी 8 वर्षे काम केले. इथे आल्यानंतर डिजीटल शिक्षणाची सुविधा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रयत्न सुरू केला. आता तीन वर्गात डिजीटल शिक्षणाची सुविधा आहे. यासाठी ग्रामपंचायतीनेदेखील सहकार्य केले आहे.

कोरोनाच्या काळात शाळा बंद होत्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद कायम ठेवला. ऑनलाईन  आणि ऑफलाईन पद्धतीने शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली.  त्यासाठी गावातील  सुशिक्षित तरुणांची मदत घेतली.  इंग्रजी भाषेशी संबंधित उपक्रमांवर अधिक भरा दिला.

राहूल वळवी, नितीन वळवी या तरुणांना पेनड्राईव्हमध्ये सूंपर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला. या तरुणांनी स्वत: अभ्यास करून विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम केले. रोहिणी यांनी स्वत:देखील आठवड्यातील 3 दिवस पाड्यांवर जावून अध्यापनाचे काम केले. अद्यापही हा उपक्रम सुरूच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडलेला नाही.

कोरोना संकटाच्या काळात जनजागृती उपक्रमातही त्यांनी सहभाग घेतला. शाळेच्या परिसरातील विद्यार्थी  व पालकांना सॅनिटायझार आणि मास्कचे वाटप करण्यात आले. आले. गावातील तरुणींनी मोफत सॅनिटरी पॅडचे वाटपही करण्यात आले. याचा संपूर्ण खर्च त्यांनी स्वत:च केला.

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वातावरणाशी संबंध कायम रहावा आणि त्यांच्यातील उपजत गुणंना वाव मिळावा यासाठी याच कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ऑनलाईन कथाकथन स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परस्परांशी संवाद साधण्याची संधी देण्यात आली.  लेखन व चित्रकला साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करण्यात रोहिणी यांनी पुढाकार घेतला. शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजनदेखील करण्यात आले.

विद्यार्थ्यांचे निसर्गाशी नाते जोडण्यासाठी आणि त्यांनी कृतीशील उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणाची माहिती देण्यासाठी ‘सीड बॉल’ तयार करून पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांची शाळेविषयी गोडी कायम रहावी म्हणून त्यांनी बैठ्या खेळाच्या साहित्याचे वितरण स्वखर्चाने केले. विद्यार्थ्यांची लेखनाची सवय काम रहवी यासाठी ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन केले.

‘गोष्टीचा वार शनिवार’  या अभिनव उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमधील सभाधिटपणाला चालना देण्याचे काम त्यांनी केले आहे. विद्यार्थीदेखील या उपक्रमात हिरिरीने सहभागी होतात. कोरोना काळात शिक्षणासाठी दूरचित्रवाणीची मदत घेण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या मोबाईलमध्ये आवश्यक ॲपची सुविधा करून देण्याचे काम त्यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन केले.

दैनंदिन कामकाजही नेटकेपणाने करण्यावर त्यांचा भर असतो. स्वाध्याय ॲपमध्ये 100 टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेण्याचा आत्मविश्वास घेऊनच शाळेतून बाहेर पडावा असा त्यांचा प्रयत्न आहे. स्पर्धा, उपक्रम यासाठी पदरचा खर्च करून विद्यार्थ्यांचे हीत जपण्याच्या त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्यातील कर्तव्यपरायणतेचे दर्शन घडते.

 

नितीन वळवी, ग्रामस्थ-कोरोना काळात आपल्या पदवी शिक्षणाचा मुलांना उपयोग व्हावा असे वाटत होते. मॅडमनी प्रोत्साहन दिले. अभ्यासक्रम पेनड्राईव्हमध्ये उपलब्ध करून दिला. सतत व्हॉट्सॲपवर अपडेट उपलब्ध करून दिले. त्यामुळे मुलांना शिकविण्याचा आनंद घेता आला.

 

रमेश वळवी, सरपंच लोय ता.नंदुरबार-रोहिणी पाटील यांनी गावातील मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. लॉकडाऊन काळातही आठवड्यातून तीन दिवस त्या मुलांना शिकविण्यासाठी यायच्या. गावात त्यांनी इतरही चांगले उपक्रम राबविले आहेत.

जिल्हा माहिती कार्यालय,  नंदूरबार

Exit mobile version