मराठवाड्यावर यंदा वरुणराजाने कृपा केली असून विभागातील 11 मोठ्या धरणांपैकी जायकवाडी धरणात सर्वाधिक पाणीसाठा झाला असून धरणाचे सत्तावीस दरवाजे दोन फुटांनी उघडण्यात आले आहेत. सलग चार महिने सुरू असलेला जोरदार पाऊस अन धरण क्षेत्रात झालेली अतिवृष्टी यामुळे मराठवाड्यातील मोठी आठ धरणे काठोकाठ भरली आहेत. तर सर्वात मोठ्या जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातून दुथडी भरून गोदामाईचा प्रवास सुरू झाला आहे.
या पावसाने जिल्ह्यातील मध्यम आणि लघु तलाव तुडुंब भरले आहेत. नदी-नाले खळखळून वाहत आहेत. मराठवाड्यात तब्बल आतापर्यंत 116 टक्के पाऊस कोसळला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 159 टक्के तर जालना जिल्ह्यात 150 टक्के पाऊस झाला. बीड 122, हिंगोली 116, लातूर 104, परभणी 100, नांदेड 97 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 96 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील मोठ्या धरणांमध्ये तब्बल 99 टक्के पाणीसाठा झाला आहे.
गोदावरी नदी पात्रात तब्बल एक लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यापाठोपाठ येलदरी आणि सिद्धेश्वर ही दोन्ही धरणे ओसंडून वाहत असून अजूनही या धरणात अनुक्रमे 27 आणि 31 टीएमसी पाण्याची आवक होत आहे. लोअर तेरणा, सिना कोळेगाव, विष्णूपुरी आदी धरणांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. माजलगाव आणि मनार ही धरणेही काठोकाठ भरली असून धरणांमध्ये पाण्याची आवक सुरूच आहे. सिना कोळेगाव धरणही तुडुंब भरण्याच्या बेतात आहे. निम्न दुधना धरणात नऊ टीएमसी पाण्याची आवक सुरू असून धरण साठा 85 टक्क्यावर पोहोचला आहे.