Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सावली, सिंदेवाही, ब्रम्हपुरी तालुक्यात ७५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

चंद्रपूर, दि. 21 ऑगस्ट :  सिंचनाच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहिला पाहिजे, याला आपले प्रथम प्राधान्य आहे. गोसीखुर्द धरणामुळे सिंचनाचा सर्वाधिक फायदा चंद्रपूर जिल्ह्याला झाला असून ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाही तालुक्यातील 75 हजार 329 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

ब्रम्हपुरी येथे गोसीखुर्द प्रकल्पातून खरीप हंगामात शेतक-यांना पाणी सोडण्याबाबत तसेच उपसा सिंचन योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.सदस्य प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, गोसीखुर्द उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता संदीप हासे, कार्यकारी अभियंता (धरण) रा.गो. शर्मा, कार्यकारी अभियंता (आसोलामेंढा) राजेश सोनवणे, कार्यकारी अभियंता (घोडाझरी) पृथ्वीराज फाळके, तहसीलदार विजय पवार आदी उपस्थित होते.

ब्रम्हपुरी क्षेत्र सिंचनामध्ये अग्रेसर झाले आहे, असे सांगून पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, सावली तालुक्यात 28 हजार 427 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली, सिंदेवाही तालुक्यातील 22 हजार 753 हेक्टर तर ब्रम्हपुरी तालुक्यातील 24 हजार 149 हेक्टर क्षेत्र असे एकूण 75 हजार 329 हेक्टरवर सिंचनाची सोय झाली आहे. त्याचा फायदा शेतक-यांना होत आहे. पाण्याचा योग्य वापर होणे आवश्यक असून विनाकारण पाणी वाया जाता कामा नये. शेतीसाठी सिंचनाद्वारे देण्यात येणारे पाणी वाया जात असेल तर पाणी वाटप संस्थांवर कारवाई करण्याचे अधिकार विभागाला आहे. सिंचनाचे पाणी शेतक-यांना नियमित आणि वेळेवर मिळणे आवश्यक असल्यामुळे याबाबत त्वरीत सर्व पाणी वाटप संस्थांची बैठक घ्यावी, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच सिंचनाची जी कामे सुरू आहेत, त्याची मुदत कितीपर्यंत आहे, पूर्ण – अपूर्ण कामांची यादी, खर्च झालेला निधी, आवश्यक असलेला निधी आदींबाबत त्यांनी माहिती जाणून घेऊन एकत्रित प्रस्ताव तात्काळ सादर करावा, असेही निर्देश दिले.

गोसीखुर्द उजवा कालवा विभागाच्या कार्यक्षेत्रात 56 पाणी वापर संस्था स्थापित झाल्या असून त्यापैकी 9897 क्षेत्राकरीता 24 पाणी वापर संस्था हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. तसेच उजवा कालव्यावरील वितरण प्रणालीचे काम 83 टक्के पूर्ण झाले आहे. उजव्या मुख्य कालव्याद्वारे आसोलामेंढा धरणाच्या मुख्य कालव्यात थेट पाणी सोडून आसोलामेंढा प्रकल्पाच्या शेवटच्या भागापर्यंत पाणी देण्यात येत आहे. आसोलामेंढा धरणाची सिंचन क्षमता 54879 हेक्टर आहे. यापैकी 39537 हेक्टरवर सिंचन क्षमता निर्मिती झाली आहे. तसेच सिंचन क्षेत्र 41575 हेक्टर असून 29952 हेक्टरवर सिंचन सुविधा करण्यात आली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते गोसीखुर्द प्रकल्प विश्रामगृहाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. बैठकीला सहाय्यक अभियंता जी.बा.मडावी, अ.अ.बिमोटे, उपअभियंता गी.भ. टिपले, गोसीखुर्द आसोलामेंढा कालवे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी वि.क.अगडे यांच्यासह खेमराज तिडके, राजेश कांबळे आदी उपस्थित होते.

Exit mobile version