Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

धुळे जिल्ह्यातील 47 आदिवासी पाडे आजही आहेत कोरोनामुक्त

स्वयंशिस्त आणि शासनाच्या कोरोनाविषयक नियमावलीचे पालन

पहिल्या लाटेत शहरी आणि निमशहरी भागापुरता मर्यादित राहिलेला कोरोना दुसऱ्या लाटेत मात्र देशभरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात  पसरत आहे ही चिंतेची बाब ठरली आहे. ग्रामीण भागातील अपुरी वैद्यकीय साधने आणि एकंदर पायाभूत सुविधा लक्षात घेता  इथे कोरोनाला रोखणे हे प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यासाठी एक प्रकारची आव्हानात्मक परिस्थिती असते.

गेल्यावर्षी आलेली पहिली लाट आणि यावर्षी मार्चपासून आलेली दुसरी लाट याचा महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांना फटका बसला असून प्रत्येक जिल्हा, शहर, गाव खेडे कोरोना संसर्ग बाधित झाले असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. मात्र चित्राला अपवाद ठरेल अशी स्थिती धुळे जिल्ह्यात  आढळून आली. जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात 47 आदिवासी पाडे आजही कोरोनामुक्त राहिले असल्याचे आढळून आले  आहे .  गेले वर्षभर विशेषतः दुसऱ्या लाटेत या परिसरात अजून एक ही कोरोना रुग्ण आढळला नाही. जिल्हयात आतापर्यत  कोरोना संसर्गाने हजारो लोक बाधित झाले आहेत अनके जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र  शेरसिंगपाडा, बोरपाणी, मालपुरपाडा, अमरपाडा, चाकडू, वाकपाडा, सजगारपाडा अश्या 47 पाड्यावर कोरोनाचा अजूनही फैलाव झाला नाही ही आदिवासी बहुल भागासाठी विशेष बाब ठरली आहे.

ग्राम पंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागाने घेतलेली खबरदारी  आणि केलेल्या उपाययोजना आणि त्याची काटेकोर अंमलबजवणी करून गावकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद ही त्रिसूत्री इथे  महत्वाची ठरली आहे.

 

आदिवासी गावाची विरळ वस्ती ,दोन घरात असलेले अंतर ,त्यांच्या परिसर स्वच्छतेच्या पूर्वापार कल्पना  तसेच त्यांची नैसर्गिकरीत्या चांगली  असलेली प्रतिकारशक्ती  आणि निसर्गाशी अनुरूप जीवनशैली कारणीभूत असल्याचे शिरपूर तालुका  आरोग्य अधिकारी डॉ प्रसन्न कुलकर्णी यांनी सांगितले. याशिवाय केंद्रसरकार आणि राज्य सरकार यांच्याद्वारे रेडीओ, टेलीविजन आणि इतर पारंपरिक माध्यमातून केली जाणारी  कोविड विषयक जनजागृती  आणि आरोग्य विभागाने या पाड्यांमध्ये  वेळोवेळी आरोग्य तपासणी केली  त्याचाही फायदा झाल्याचे कुलकर्णी यांनी संगितले.

गावकऱ्यानी मास्क लावणे , हात धुणे आणि सामाजिक अंतर पाळणे या नियमांचे पालन केले तर ग्रामपंचायतीने सानिटायझर्स वाटप आणि परिसरात  जन्तुनाशकांची फवारणी केली

आदिवासी गावकऱ्यांनी आणि  सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या आदिवासी गावामध्ये छोटया छोटया गोष्टीच पालन तर केलेच शिवाय गेल्या महिन्यात दुसरे लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर गावाबाहेरील व्यक्तीला गावात न येण्यासाठी गावबंदी करून  एकजुटीने कोरोना सारखा घातक आजाराला आपल्या वस्त्यांमध्ये प्रवेश करू दिला  नाही असे  या परीसरातील बोराडी या तुलनेत मोठ्या गावाचे उपसरपंच राहुल रंधे यांनी सांगितलं.

कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराला केवळ शासनाच्या नियमावली चे पालन करून आणि स्वयम शिस्त पाळून आदिवासी बांधव रोखू शकत असल्याने  हे उदाहरण निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

Exit mobile version