Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

ओबीसी विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी २९३ कोटी मंजूर

मुंबई, दि. २९ :  बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी, प्रवर्गातील  दहावीनंतर पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी २९२ कोटी ८१ लाख ८५ हजार रुपये शासनाने मंजूर केले असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील दहावीपुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंजूर झालेली ही रक्कम महाडीबीटी प्रणालीद्वारे वितरित केली जाणार आहे. यापूर्वी ४३६ कोटी रुपये रक्कम वितरित करण्यास सप्टेंबरमध्ये मान्यता दिली होती. ही रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर महाडीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात आली असल्याची माहिती श्री.वडेट्टीवार यांनी दिली आहे.

राज्य शासनाच्या बहुजन कल्याण विभागाच्या वतीने ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी या प्रवर्गातील मुलामुलींना शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती देण्यासाठी २९२कोटी ८१ लाख ८५ हजार रुपये मंजूर झाल्याने विद्यार्थ्यांकडून मंत्री श्री. वडेट्टीवार यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

Exit mobile version