Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता

मुंबई  : एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासंदर्भात पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभुमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने दि. 27 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी केली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने दि. 27 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन परिवहन मंत्री श्री. परब यांनी मंत्रालयात संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक आयोजित करुन तोडगा काढला.

परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी यासंदर्भात घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने पुकारलेले बेमुदत उपोषण आज मध्यरात्रीपासून 12 पासून मागे घेऊन राज्यभरातील एसटीची वाहतूक सुरळीत सुरु होईल असे आश्वासन महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने जाहीर केले.

या बैठकीत एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडणार आर्थिकभार, कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती यावर सविस्तर चर्चा करुन एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच वार्षिक वेतनवाढीसंदर्भात एसटी महामंडळ सकारात्मक असून याबाबत दिवाळीनंतर बैठक आयोजित करण्यात येईल, असेही श्री. परब यांनी सांगितले.

श्री.परब म्हणाले, एसटी कमचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून एसटी कर्मचाऱ्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता वाढ केल्यामुळे आता महागाई भत्ता 12 टक्क्यावरुन थेट 28 टक्के होणार आहे आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे.

Exit mobile version